• Sat. Sep 21st, 2024

परदेशातील मोठ्या पगाराची नोकरी डावलली, उच्चशिक्षित तरुण APMCमध्ये भाजीविक्रीकडे परतले!

परदेशातील मोठ्या पगाराची नोकरी डावलली, उच्चशिक्षित तरुण APMCमध्ये भाजीविक्रीकडे परतले!

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : वाडवडिलांनी सुरू केलेला उद्योगव्यवसाय आपण जपायला हवा, तसेच ९ ते ५ या नोकरीच्या चक्रात अडकून राहण्यापेक्षा व्यवसायवृद्धींवर अधिक भर द्यावा यासाठी आता सर्वांत मोठ्या एपीएमसी बाजारपेठेतील तरुण पुढे सरसावले आहेत. नवी मुंबई येथील भाज्या तसेच, फळांच्या या सर्वांत मोठ्या बाजारपेठेत तरुणांनी पुढाकार घेत नव्या तंत्रज्ञानाच्या सोबतीने या व्यवसायाचा पसारा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

या उच्चशिक्षित तरुणांना गलेलठ्ठ वेतनाची संधी होती, परदेशामध्येही नवीन आकाश खुणावत होते. तरीही त्यांनी करोनानंतर येथेच थांबण्याचा निर्णय घेतला. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने या तरुणांकडून हे संक्रमण जाणून घेतले. २३ वर्षीय ओमकार मोरे याने डी. वाय. पाटील महाविद्यालयातून बीबीएची पदवी घेतली. त्यांच्या वडिलांचा पालेभाजीचा व्यवसाय होता. त्याने आता इतर भाज्यांच्या खरेदीविक्री प्रक्रियेत जम बसवायला सुरवात केली आहे. नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा ‘ब्रॅण्ड’ विकसित करणे त्याला अधिक महत्त्वाचे वाटले. या बाजारामध्ये एक वेगळे अर्थशास्त्र आहे. ते समजून घेत काम करण्यामध्ये वेगळा आनंद आहे. सुरुवातीला वाटायचे फक्त भाजीचा व्यवसाय त्यात काय शिकणार… परंतु आता देशविदेशामध्ये माल निर्यात करण्यासाठी संधी शोधणे, भाज्यांची गुणवत्ता, शेल्फलाइफ अशा असंख्य गोष्टींमध्ये नव्याने काम करता येणे शक्य आहे, असा विश्वास ते व्यक्त करतात. पूर्वी येईल तो ग्राहक आपलाच अशी भूमिका होती. मात्र आता त्यांनी उत्तम गुणवत्तेसाठी आग्रही असलेला खात्रीशीर ग्राहकही नेमका समजला आहे. उद्योगव्यवसायमध्ये चढउतार असतात, परंतु नोकरीपेक्षा यात काम करताना अधिक आनंद मिळतो ही भावना त्याला प्रेरणा देणारी आहे.

Mumbai News: मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार; वर्सोवा-दहिसर मार्गाला गती, असा असेल मार्ग

सुनीलने बॅंकिंग आणि एमबीए या पदवी घेतल्यानंतर कांदा बाजारामध्ये नव्या उमेदीने काम करायला सुरवात केली. वडिलोपार्जित व्यवसायामध्ये लक्ष दिले नाही, त्यात बदल न केल्यास आपली मक्तेदारी राहत नाही, ही उपजत समज घेऊन त्याने पंचवीसाव्या वर्षी याच धंद्यामध्ये स्थिरस्थावर होण्याचा निग्रह केला आहे. एमबीए केल्यामुळे मिळालेल्या ज्ञानाचा फायदा त्याला संवादकौशल्य वाढवण्यासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधील संधी हेरणे, शेतकरी ते ग्राहक अशी सक्षम साखळी तयार करण्याच्या दृष्टीने होत आहे. फळांचे ब्रॅण्डिंग, त्यातही स्वतःचा ब्रॅण्ड तयार करण्याच्या दृष्टीने त्याने काम सुरू केल्याचे सुनील आवर्जून सांगतो.

कामाच्या वेळा वेगळ्या तरीही

एपीएमसी बाजाराचा सगळा कारभार हा रात्री सुरू होतो. मालाची आवक, त्याचे वितरण, विक्री हे पहाटेपर्यंत सुरू असते. त्यामुळे संध्याकाळी मोकळा वेळ मिळत नाही. रात्रभर जागरण केल्यामुळे सकाळी बराच वेळ झोपेत जातो. कामाच्या वेळा वेगळ्या असल्याने इतरांप्रमाणे जुन्या मित्रमैत्रिणींना वेळ देता येत नाही. परंतु शिकण्यासारख्या अनेक गोष्टी असल्याने काम केल्याचे समाधान मिळते, ही बाब हे तरुण आवर्जून सांगतात.

मोठ्यांचा अनुभव, शिक्षणाची शिदोरी

ज्यांनी वर्षोनुवर्ष या बाजारामध्ये काम केले आहे त्यांना भाजीपाल्याचे उत्पादन, रागरंग, आयात निर्यातीचे चोख अंदाज माहीत आहेत. जाणत्यांचा अनुभव आणि शिक्षणामुळे आलेले व्यावसायिक कौशल्य यांचा मिलाफ भविष्यात या व्यवसायाला नवी उभारी देईल याकडे हे तरुण लक्ष वेधतात. ग्लॅमर नसलेला उद्योग असे ‘बिरुद’ भाजीफळे विक्री व्यवसायाला लावण्याचा प्रयत्न केला जातो. कोणत्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात ही छोट्या प्रयत्नांमधून होत असते, हे सूत्र मनात रुजवून रोहन कामथेसारखे तरुण दमदारपणे कामाला लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed