• Tue. Nov 26th, 2024

    निसर्गकवी रानात कायमचा विसावला, ना. धों. महानोर अनंतात विलीन, पळसखेड्यात अंत्यसंस्कार

    निसर्गकवी रानात कायमचा विसावला, ना. धों. महानोर अनंतात विलीन, पळसखेड्यात अंत्यसंस्कार

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : निसर्गकवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी शासकीय इतमामात त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. शेकडो चाहत्यांच्या उपस्थितीत निसर्गकवी रानात कायमचा विसावला. ‘पीक करपलं, पक्षी दूर देशी गेलं’ या कवितेच्या गायनाने महानोर यांना शेवटचा निरोप देण्यात आला.
    निसर्गकवी ना.धों. महानोर कालवश, पुण्यातील रुग्णालयात अखेरचा श्वास
    ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांचे पार्थिव रात्री पुण्याहून पळसखेडे (ता. सोयगाव) येथील निवासस्थानी आणण्यात आले होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मान्यवर आणि साहित्य रसिक यांची अंत्यदर्शनासाठी रीघ लागली होती. शेतातील सुलोचना बागेत महानोर यांच्यावर सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबातील सदस्यांनी एक एक गोवरी घेऊन मुखाग्नी दिला. यावेळी ‘पीक करपलं, पक्षी दूर देशी गेलं, गाळणाऱ्या झाडांसाठी मन ओथंबलं’ या महानोर यांच्या कवितेचे गायन सुदीपा सरकार यांनी केले. महानोर यांना अखेरचा निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर झाले. महानोर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे नियोजन छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्हा प्रशासनाने केले. नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर, छत्रपती संभाजीनगरचे अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे, सिल्लोडचे तहसीलदार रमेश जसवंत, सोयगावचे तहसीलदार मोहन हरणे, पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांनी मानवंदना दिली. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी महानोर यांच्या आठवणींना उजाळा दिला.
    N D Mahanor: मला शेतावर घेऊन चल, गाणं ऐकल्यावर डोळ्यातून पाणी; ना.धों. महानोरांच्या लेकीचा कंठ दाटून आला
    मान्यवरांचा उजाळा

    महानोर यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेक मान्यवर भावविवश झाले. यावेळी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, अविनाश जैन, दादा नेवे, राजा मयूर, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर, कौतिकराव ठाले पाटील, चंद्रकांत पाटील, रंगनाथ पठारे, डॉ. दादा गोरे, श्रीकांत देशमुख, प्रा. ऋषिकेश कांबळे, अजीम नवाज राही, दासू वैद्य, प्रतिभा शिंदे, अशोक कोतवाल आदी मान्यवर उपस्थित होते. शंभू पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed