अमरावतीमध्ये महापुरुषांच्या स्मारक, पुतळा सुशोभिकरण कामासंदर्भात येत्या पंधरा दिवसात बैठक घेऊन मार्ग काढणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 3 : अमरावती येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक छत्री तलाव परिसरात बांधकामासाठी तसेच, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा इर्विन चौक येथे उभारुन पुतळा परिसर स्मारकाकरीता व सौंदर्यीकरण करण्याकरीता जमिन अधिग्रहनाबाबत संबंधित जमिन मालकासोबत येत्या पंधरा दिवसांत बैठक घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य रवि राणा यांनी या संदर्भातील लक्षेवधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, अमरावती येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक तसेच, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासोबतच संबंधित संत, महापुरुषांच्या स्मारक, पुतळा सुशोभिकरण अनुषांगिक कामासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही तातडीने केली जाईल, असे सांगितले.
००००
वंदना थोरात/विसंअ/
तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळावर अशासकीय सदस्यांची नियुक्ती दोन महिन्याच्या आत करणार – मंत्री शंभुराज देसाई
मुंबई, दि. 3 : तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळावर राज्यस्तरासोबतच विभागीय तसेच जिल्हास्तरीय अशासकीय सदस्यांची नियुक्ती येत्या दोन महिन्याच्या आत करण्यात येईल, असे मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य प्रताप सरनाईक यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावेळी मंत्री श्री.देसाई बोलत होते.
मंत्री श्री.देसाई म्हणाले, तृतीय पंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कृती कार्यक्रम राबवण्यात येणार असून या समूहासाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून विविध योजना एकत्रितपणे कशा राबवता येतील याचा विचार करण्यात येणार आहे. समितीच्या तीन बैठका झाल्या असून त्यांच्याकडून अहवाल मागवला आहे. या समाज घटकासाठी आरोग्य तपासणीसाठी एकदिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले त्याचा ३२७५ तृतीयपंथीयांना लाभ झाला आहे. त्यांना नवीन शिधापत्रिका सुलभतेने मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष मोहिमेचे आयोजन करण्याबाबत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. पोलिस पदासाठीच्या ऑनलाईन अर्जामध्ये पुरुष, महिला बरोबरच तृतीयपंथी उमेदवारांसाठीही पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
गृह विभागामार्फत आजच पोलिस महासंचालकांच्या माध्यमातून सर्व पोलिस स्टेशनमध्ये सूचना देण्यात येईल की पोलिस स्टेशनमध्ये आलेल्या तृतीयपंथीयांना इतर नागरिकांप्रमाणेच चांगली वागणूक देण्यात यावी. असे मंत्री श्री.देसाई यांनी सांगितले. या चर्चेत सदस्य वर्षा गायकवाड, अनिल देशमुख, विश्वजीत कदम यांनी सहभाग घेतला.
००००
वंदना थोरात/विसंअ/
विदर्भातील अचलपूर-मूर्तीजापूर लोहमार्गावरील शंकुतला नॅरोगेज रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्यासंदर्भातील प्रकल्प अहवाल तातडीने करणार – मंत्री शंभुराज देसाई
मुंबई, दि. 3 : विदर्भातील अचलपूर मूर्तीजापूर या लोहमार्गावर चालणाऱ्या शंकुतला या नॅरोगेज रेल्वे गाडीचा रेल्वे मार्ग ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्यासंदर्भात तातडीने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाणार असून या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरुन लवकरच बैठक घेऊन काम पूर्णत्वास जाण्यासाठी तत्परतेने कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री शंभुराजे देसाई यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य बच्चु कडू यांनी यासंदर्भातील लक्षवेधी उपस्थित केली होती,तिला उत्तर देताना मंत्री श्री.देसाई बोलत होते.
मंत्री श्री.देसाई म्हणाले, राज्याचे रेल्वे मार्ग धोरण अंतिम टप्प्यात आहे. ते धोरण लवकरच निश्चित केले जाईल. या रेल्वे मार्गाच्या रुपांतराचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल. तसेच हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून केंद्राकडे त्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल,असे मंत्री श्री.देसाई यांनी सांगितले. या चर्चेत सदस्य हरीश पिंपळे, रवि राणा, आशिष शेलार यांनी सहभाग घेतला.
००००
वंदना थोरात/विसंअ/
दिव्यांगांच्या शाळांबाबत तीन महिन्यात धोरण निश्चित करणार – मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. 3 : राज्यातील दिव्यांग मुलामुलींच्या शाळा, कर्मशाळा व मतिमंद मुलांचे बालगृहाबाबत तीन महिन्यांच्या आत धोरण निश्चित केले जाईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य ॲड. आशिष जयस्वाल यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री.देसाई बोलत होते.
ते म्हणाले की, दिव्यांगाबाबत राज्य सरकार संवेदनशील असून दिव्यांग कल्याण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने दिव्यांगांच्या शाळा, पदांना मान्यता देण्याचे निकष,धोरण काय असावे याचे प्रारुप सादर केले आहे. ते मान्यतेसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल. त्यानुसार तीन महिन्याच्या आत दिव्यांगाच्या शाळांसंदर्भात धोरण निश्चित केल्या जाईल. यामध्ये दिव्यांग कल्याण मंडळांच्या अध्यक्षांचाही सल्ला घेतला जाईल, असे मंत्री श्री.देसाई यांनी यावेळी सांगितले. सदस्य बच्चू कडू यांनी या चर्चेत सहभाग घेतला.
००००
वंदना थोरात/विसंअ/
नंदुरबार जिल्ह्यातील रावळापाणीच्या पर्यटन
विकासासाठी निधी देणार – मंत्री डॉ. विजयकुमार गावित
मुंबई, दि. ३ : नंदुरबार जिल्ह्यातील रावळापाणी या गावाला ऐतिहासिक महत्व आहे. या गावाचा पर्यटनदृष्ट्या विकास व मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य राजेश पाडवी यांनी रावळापाणी या आदिवासी पाड्याच्या पर्यटन विकासासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री डॉ. गावित म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यातील रावळापाणी या पाड्यात बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेअंतर्गत रस्ते बांधण्यात येणार आहेत. या पाड्यात पर्यटन विभागाच्या 30 मार्च 2017 रोजीच्या निर्णयान्वये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत ऐतिहासिक, सामाजिक धार्मिक पर्यटन स्थळांच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मुख्य इमारत, आवार भिंत, बाग-बगीचा, प्रवेशद्वार अंतर्गत सुशोभीकरण पाणीपुरवठा व स्वच्छता या बाबींचा अंतर्भाव असून मुख्य इमारतीचे काम प्रगतिपथावर आहे.
यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सहभाग घेतला.
शैलजा पाटील/विसंअ/
000