• Tue. Nov 26th, 2024

    ठाणे येथे राज्यातील पहिले ‘अवयवदान जनजागृती उद्यान’- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    ByMH LIVE NEWS

    Aug 3, 2023
    ठाणे येथे राज्यातील पहिले ‘अवयवदान जनजागृती उद्यान’- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई दि.३-: देशभरात आज ‘राष्ट्रीय अवयवदान दिवसʼ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी प्रयत्नांचा भाग म्हणून राज्यातील पहिले ‘अवयवदान जनजागृती उद्यानʼ ठाण्यात तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच भविष्यात अशा स्वरूपाचे उद्यान राज्यातील इतर शहरात महापालिका आणि नगरपरिषदेतर्फे चालू करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

    मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले की, राज्यातील हे पहिले उद्यान कै. इंदिरा बाबुराव सरनाईक उद्यान, कम्युनिटी पार्क, पोखरण रोड नं २, येथील ६ हजार चौरस मीटरच्या जागेवर तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी अवयवदान संदर्भातील माहिती पुस्तिका उपलब्‍ध करून देण्यात येणार आहे. या उद्यानाची योग्य पद्धतीने देखभाल करण्यासाठी महापालिकेतर्फे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल. प्रस्तावित उद्यानात मूत्रपिंड (किडनी), यकृत ( लिव्हर), हृदय, फुफ्फुस, स्वादुपिंड, छोटे आतडे, डोळे, त्वचा, हाडे, हात या अवयवाच्या आणि पेशींच्या प्रतिकृती उभारण्यात येणार आहेत. तसेच या अवयवांसंदर्भातील माहिती त्याठिकणी मोठ्या फलकावर लावण्यात येईल. अवयवदानासंदर्भातील शास्त्रीय स्वरूपाची माहिती या ठिकाणी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या उद्यानात अवयव दान करण्याचा प्रतिज्ञा अर्ज नागरिकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. ज्या नागरिकांना हा अर्ज भरायचा आहे त्यांच्याकडून तेथेच भरून घेण्यात येईल. त्यानंतर तो अर्ज नोंदणीकरिता राज्य अवयव आणि उतीपेशी प्रत्यारोपण संस्था या राजस्तरीय संस्थेच्या कार्यालयात सुपूर्द करण्यात येईल.

    अवयव दान ही काळाची गरज आहे, याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता आल्यास अनेक जीव वाचण्यास मदत होणार आहे. यासाठी शासकीय आणि सामाजिक स्तरावर अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. या विषयवार अधिक व्यापक प्रमाणात जनजागृतीची व्हावी आणि अवयवदानासंदर्भात सोप्या पद्धतीने माहिती उपलब्ध व्हावी, याकरिता ठाणे येथील उद्यान महत्वाचे असणार आहे.  नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर अवयवदानाचे अर्ज भरुन शासनाच्या मोहिमेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी यानिमित्ताने केले आहे.

    सध्याच्या घडीला एक मेंदूमृत व्यक्ती अवयवदान करून ८ व्यक्तींना जीवनदान देऊ शकते. गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच वैद्यकीय विश्वातील प्रगतीमुळे अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे. त्यामुळे अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण पुढे येत आहे. मात्र मेंदूमृत व्यक्तीकडून अवयवदान होण्याची संख्या आणि अवयवाची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. ती दूर करण्यासाठी मेंदूमृत अवयवदान मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. सध्या राज्यात अवयव प्रत्यारोपणासाठी मोठ्या प्रमाणावर रुग्ण प्रतिक्षेत आहेत. यात किडनी प्रत्यारोपणासाठी  – ५,८३२, लिव्हर प्रत्यारोपणासाठी  – १,२८४, हृदय प्रत्यारोपणासाठी – १०८, फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी – ४८,  स्वादुपिंड प्रत्यारोपणासाठी – ३५, छोटे आतडे प्रत्यारोपणासाठी – ३ एवढे रुग्ण प्रतिक्षेत आहेत.

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed