• Sat. Sep 21st, 2024
भय इथले संपत नाही! मरणाआधीच उपचारासाठी निघते तिरडी; आजारी महिलेला खांद्यावरून नेण्याची वेळ

सातारा: सहयाद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनचा शिक्का बसलेले आणि जावली तालुक्यातील शेवटच्या टोकावरच दुर्गम देऊर (गुढीची मळ). आजही गावातील नागरिकांच्या समस्या ६० वर्षांपासून जैसे थे’च आहेत. गंभीर आजारी पडलेल्यांना दवाखान्यात नेण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून येथे झोळीची रुग्णवाहिका करून तासभर घनदाट जंगलासह डोंगरदरीतून पायपीट करावी लागते. सरकार आणि प्रशासनाने कितीही देश बदलत असल्याचा गाजावाजा केला तरी “भय इथले संपत नाही” याचा अनुभव येथील नागरिकांना नुकताच मुसळधार पावसात आला.
शाळेची इमारत धोकादायक स्थितीत; विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, संतापलेल्या नागरिकांनी थेट…
रविवारी सकाळी देऊर गावच्या रहिवासी सोनाबाई लक्ष्मण माने (६२) या अचानक गंभीर आजारी पडल्या. त्यांची प्रकृती खालावू लागल्याने त्यांना दवाखान्यापर्यंत न्यायचं कसं? असा प्रश्न कुटुंबियासमोर उभा राहिला. अखेर देऊर वेळे गावचे माजी सरपंच कुजी कोकरे, वनसमिती अध्यक्ष मंगेश माने, पोलीस पाटील बाळकृष्ण आखाडे यांनी दोन बांबूच्या लाकडांना झोळी बांधून त्यात रुग्णाला बसवून चौघांनी खांद्यावर घेतली. घनदाट जंगल, डोंगरदरीतून मुसळधार पावसात तास दीड तासाची पायपीट करत सड्यावरील रस्त्यावर आणलं. तिथून खासगी वाहनातून चाळकेवाडीपर्यंत आणि तेथून १०८ रुग्णवाहीकेतून सातारा गाठला.

या चार तासाच्या प्रवासात आणखीनच रुग्णाची प्रकृती खालवली होती. या महिलेला वेळेत उपचार मिळाले नाहीत. त्यांच्यावर अजिंक्यतारा या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. पेशंटला वेळेत आणले असते, तर काहीतरी उपचार झाले असते, पण आता काही करता येणार नाही. येवढी वाईट परिस्थिती असताना आमच्या गावाचा ६० वर्षांपासून का विचार होत नाही. ईशाळवाडीचे पुनर्वसन ७ दिवसात मंजूरी मिळून काम चालू होते. परंतु आमची ही अत्यंत वाईट परिस्थिती असून लक्ष देत नाहीत. माणूस मेल्यावर सरकारला जाग येणार का?

कोविड काळात जॉब सिक्युरिटी नाहीशी झाली, एमबीए तरुणानं मुंबई सोडून गावात सुरु केलं पॉल्ट्री फार्म

चारी बाजूला घनदाट जंगल. त्यातच हिंस्र वन्य प्राण्याचा वर आहे. वन्य प्राण्यांकडून शेती आणि पाळीव प्राणी वारंवार फस्त होत आहेत. हाताला रोजगार मिळत नाही. जमीन आमची आहे. मात्र, हस्तांतरण, वारस नोंदी किंवा कोणताही शासकीय योजना द्यायची झाल्यास बंदी आहे. त्यामुळे आम्ही जगायचे कसं. आमची नवीन पिढी रोजगारासाठी देशोधडीला लागली. अजून आमचा किती अंत पाहणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आमची पुर्नवसन प्रकिया तत्काळ राबवून आम्हाला मरणयातनेतून बाहेर काढा, अशी आर्त हाक या नागरिकांनी मारली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed