हवाई प्रवासादरम्यान एका ६० वर्षीय बांगलादेशी प्रवाशाला दोनवेळा रक्ताची उलटी झाली. प्रवाशाची प्रकृती लक्षात घेत एअर अरेबियाच्या शारजाह-चितगाव या विमानाचे बुधवारी सकाळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डिंग झाले. सध्या हा प्रवासी खासगी इस्पितळात भरती असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
एअर अरेबियाचे शारजाह-चितगाव विमानाने पहाटे उड्डाण भरले. प्रवासादरम्यान एका ६० वर्षीय प्रवाशाला दोन वेळा रक्ताची उलटी झाली. प्रकृती अधिक बिघडू नये या उद्देषाने विमानाचे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आले. पहाटे ५.४० वाजतादरम्यान विमान नागपूर येथे उतरले. विमानतळावर तैनात असलेल्या किम्स-किंग्जवे हॉस्पिटलचे डॉ. हेमंत भोंडेकर यांच्या नेतृत्वातील वैद्यकीय चमूने प्रवाशाची प्राथमिक तपासणी केली. त्यानुसार त्याला किम्स-किंग्जवे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. इस्पितळात हलविण्यात आले तेव्हा त्याला लो ब्लडप्रेशरचा त्रास जाणवत होता. सध्या या प्रवाशावर डॉ. समीर पाटील आणि डॉ. राजन बारोकर यांच्या मार्गदर्शनात उपचार सुरू आहेत. रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, या विमानाने सकाळी ७.१० वाजतादरम्यान चितगावच्या दिशेने उड्डाण भरले, अशी माहिती किम्स-किंग्जवे हॉस्पिटलचे उपमहाव्यवस्थापक (ब्रॅण्डिंग अॅण्ड कम्युनिकेशन्स) यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.