व्यासपीठावरुन उपस्थितांशी बोलता-बोलताच राज ठाकरे अचानक म्हणाले, “अरे तू पण आलायस का? हा माझा आवडता अत्यंत.. हो, तू तू उभा रहा” राज ठाकरे असं म्हणताच सोशल मीडिया स्टार अथर्व सुदामे प्रेक्षकात उठून उभा राहिला. “तुझ्या सगळ्या गोष्टी मी पाहत असतो बरं का” असं राज ठाकरेंनी सांगताच अथर्व ओशाळून कसनुसा हसला. आणि त्याने हात जोडून राज ठाकरेंचे आभार व्यक्त केले. “अनेकांच्या बघतो” असं राज ठाकरे बोलत असतानाच प्रेक्षकांमधून गोंगाट होऊ लागला. त्यावर राज ठाकरेंनी त्याला मंचावर बोलावलं.
“मी तुमच्याशी फार काही बोलणार नाही. इथे तुमचे कार्यक्रम होणार आहेत. अमितनेही मला तसं सांगितलं आहे. मी अमितला विचारलं, कसला कार्यक्रम आहे. त्यावर तो मला म्हणाला की, काही नाही, तू फक्त ये, दोन मिनिटं बोल आणि निघ. मी घरच्यांच्या फारसा विरोधात जात नाही. त्यामुळे मी फार बोलणार नाही” असा मिश्किल किस्सा राज ठाकरे यांनी सांगितला.
“आजची महाराष्ट्रातील राजकीय स्थिती पाहता, कोण कुठे आहे? याचा काही पत्ता लागत नाही. कोण कुठल्या पक्षात गेलाय, काहीच कळत नाही, या गोष्टींकडे केवळ तुमच्यामुळे दुर्लक्ष होतंय. आज समाज शांत बसलाय, आनंदी आहे, यामध्ये सर्वात मोठं श्रेय तुमचं आहे. मला फक्त एवढंच सांगायचंय, की तुमच्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे. महाराष्ट्रात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींबाबत तुमच्या रील्सच्या माध्यमातून प्रबोधन झालं पाहिजे. या गोष्टी तुम्ही उत्तम रितीने करू शकाल, याची मला १०० टक्के खात्री आहे. तुम्ही महाराष्ट्रांच्या प्रश्नांकडे बारकाईने लक्ष द्यावं आणि ते तुमच्या विनोदाच्या रुपाने लोकांच्या समोर यावं” अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.