• Mon. Nov 25th, 2024
    नारळ चालतो, सुकं खोबरं नाही! हवाई सुरक्षेच्या कडक नियमांत बॅगा अडकल्या

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक व्यग्र विमानतळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दररोज १२ हजार बॅग विविध कारणांनी नाकारल्या जातात. हवाई सुरक्षेसंबंधीच्या कडक नियमांमुळे विशिष्ट प्रकारचे सामान विमानात बाळगण्याची परवानगी नाही. त्यामुळेच स्वयंचलित प्रणाली हे सामान रोखते.

    जगभरातील सर्व विमानतळांच्या सुरक्षेची जबाबदारी आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटनेवर आहे. भारतात या सुरक्षेसाठी केंद्र सरकारच्या अखत्यारित ‘ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी’ (बीसीएएस) ही नोडल संस्था आहे. बीसीएएस आंतरराष्ट्रीय संघटनेचे सदस्य आहेत. बीसीएएसने निश्चित केलेले नियम व धोरण हे देशभरातील विमानतळ सुरक्षेसाठी अंतिम असतात. या अंतर्गतच बीसीएएस देशभर ‘हवाई सुरक्षा पद्धती सप्ताह’ राबवत आहे. ‘आंतरराष्ट्रीय नियमानुसार विमानात नेता येणारे व नेता न येणाऱ्या सामानांची यादी मोठी आहे. त्यामुळेच मुंबई विमानतळावर दररोज सोबत बाळगण्याच्या ६० हजार केबिन बॅगपैकी किमान १० ते १२ टक्के बॅग या स्वयंचलित स्कॅन यंत्रातून मान्य होत नाहीत. त्या बॅगची फेरतपासणी करून नको असलेले सामान बाहेर काढून पुन्हा ती बॅग पुढे नेली जाते. यामध्ये बराच वेळ जातो. रांग वाढत जाते. त्यामुळेच प्रवाशांनी बीसीएएसच्या संकेतस्थळाला भेट देऊन सामानाची यादी बघणे आवश्यक आहे’, असे बीसीएएसचे (महाराष्ट्र व गोवा) प्रादेशिक संचालक अभिमन्यूसिंह यांनी निवडक पत्रकारांना सांगितले.

    बीसीएएसने आखलेल्या नियमांनुसार, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) हे मुंबईच्या विमानतळाला सुरक्षा देत आहेत. या सप्ताहांतर्गत बीसीएएसच्या सहकार्याने सीआयएसएफ, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड, सीमा शुल्क विभाग, पारपत्र विभाग, विविध विमानसेवा कंपन्या विमानतळावर प्रवाशांमध्ये सुरक्षेबाबत जागृती करीत आहेत. हे कार्यक्रम आठवडाभर राबविले जाणार आहेत. या सप्ताहाचे उद्घाटन सोमवार, ३१ जुलैला खासदार हेमामालिनी यांच्याहस्ते झाले.
    ‘डिजि यात्रा’चे टेकऑफ सुसाट; देशातील टॉप सात शहरांमध्ये पुण्याचा नंबर कितवा?
    प्रमुख मान्य-अमान्य सामानाची यादी
    सामान केबिन चेक इन

    गिर्यारोहण निगडित एअरबॅग अमान्य मान्य
    हवाई चटई अमान्य मान्य
    कृत्रिम शोभिवंत हाडे अमान्य मान्य
    सर्व प्रकारच्या बॅटरी अमान्य मान्य
    कॅमेरा सामान मान्य मान्य
    सर्व प्रकारच्या चिकटपट्ट्या अमान्य मान्य
    नारळ ओला अमान्य मान्य
    ओला किसलेला नारळ मान्य मान्य
    सुके खोबरे (अख्ख व किसलेले) अमान्य अमान्य
    लहान ड्रोन (बंद केलेले) मान्य मान्य
    चष्म्याचा लहान स्क्रू ड्रायव्हर मान्य मान्य
    ग्ल्यू गन, खेळण्यातील शस्त्रे अमान्य मान्य
    मद्य (केवळ सील असलेले) मान्य मान्य
    प्राणवायू फक्त वैद्यकीयसाठी मान्य मान्य
    चेहऱ्याची पावडर अमान्य मान्य
    तापमापक, मेण, छत्री अमान्य मान्य

    (बीसीएएसने एकूण ११२ सामानाची यादी केली आहे. त्यातील ७० सामान प्रवासादरम्यान सोबत बाळण्याची परवनागी नाही.)

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed