ही घटना घडली तेव्हा जयपूर-मुंबई एक्सप्रेस ट्रेनच्या बोगी क्रमांक बी-५ मध्ये अनेक प्रवाशी होते. या बोगीतील एसी कोच अटेंडंट कृष्णकुमार शुक्ला यांनी घडलेल्या थरारक प्रसंगाची माहिती सांगितली. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सकाळी पाच वाजताच्या सुमारास बोगीत गोळीबाराचा आवाज आला. मी एसी कोचच्या दिशेने गेलो तेव्हा मृतदेह खाली पडलेले दिसले. पोलीस कॉन्स्टेबलच्या हातात रिव्हॉल्व्हर होती आणि तो डब्यात फिरत होतो. ASI साहेब खाली पडले होते. त्या पोलीस कॉन्स्टेबलने इतर प्रवाशांवरही गोळ्या झाडल्या होत्या. आम्ही लांबूनच हा सर्व प्रकार बघत होतो. या सगळ्या प्रकारामुळे बोगीतील इतर प्रवाशी प्रचंड घाबरले होते, अशी माहिती कृष्णकुमार शुक्ला यांनी दिली. दरम्यान, जीआरपीच्या जवानांनी गोळीबार करणाऱ्या आरपीएफ कॉन्स्टेबलला ताब्यात घेऊन बोरीवलीला आणलं आहे. तर चार जणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मानसिक तणावातून आरपीएफ कॉन्स्टेबलने गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
चेतन सिंह याने गोळीबार केल्यानंतर दहिसर स्थानकाजवळ एक्सप्रेस ट्रेनची साखळी खेचली. यानंतर रेल्वे पोलिसांनी भाईंदरमध्ये चेतन सिंह याला ताब्यात घेतले. या घटनेनंतर मुंबई सेंट्रल स्थानकात जयपूर-मुंबई ट्रेनच्या बोगी क्रमांक बी ५ ची कसून तपासणी केली जात आहे. याठिकाणी रेल्वे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत. बी-५ या बोगीच्या काचेच्या दरवाजातून गोळी आरपार गेल्याची खूण दिसत होती.