• Sat. Sep 21st, 2024

आई बाहेर गेली, भावासोबत झोका खेळू लागला, पण अचानक…; काळीज पिळवटून टाकणारी घटना

आई बाहेर गेली, भावासोबत झोका खेळू लागला, पण अचानक…; काळीज पिळवटून टाकणारी घटना

नाशिक : मृत्यू कसा आणि कधी गाठेल, याचा काही नेम नसतो, असं म्हटलं जातं. याचीच प्रचिती देणारी एक दुर्दैवी घटना नाशिक शहरातील अंबड परिसरात घडल्याचे समोर आले आहे. झोका खेळत असताना गळफास लागल्याने १० वर्षांच्या चिमुकल्याचा अंत झाला आहे. घरात दोघे भाऊ झोका खेळत असताना अचानक एकाला गळफास लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नाशिकच्या अंबड भागातील चुंचाळे अश्विन नगर परिसरात म्हाडा कॉलनीत ही घटना घडली आहे. निखिल निंबा सैंदाणे याला घरातील छतास लोखंडी हुकला लावलेल्या झोक्याच्या दोरीचा फास बसल्याने त्याचा मृत्यू झाला. वडील कंपनीमध्ये कामाला गेले होते, तर आई काही कामासाठी शेजारी गेली होती. निखिल आणि त्याचा लहान भाऊ घरात दोघेच झोका खेळत होते. लहान भावाच्या झोका खेळून झाल्यावर निखिलने झोका खेळायला सुरुवात केली.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ आता सर्वांना मिळणार; खर्चाची मर्यादाही वाढवली, कसा होणार फायदा?

दरम्यान, निखिल पलंगावरुन झोका खेळत होता. त्याने झोका गोल गोल फिरवला आणि त्याच्या मानेला झोक्याची दोरी आवळली गेली. आधी तो पलंगावर असल्याने त्याला ते जाणवले नाही मात्र त्याने उंच झोका घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याच्या गळ्याला फास लागला आणि तो खाली पडला. निखिल खाली पडल्यानंतर काहीच बोलत नसल्याने त्याचा भाऊ धावतच आईकडे गेला. निखिल झोक्यावरुन पडला असून काहीच बोलत नसल्याचे आईला सांगितले.

आईने तातडीने घराकडे धाव घेतली. निखिल खाली पडला होता. आईने तात्काळ दोरी कापून त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र निखिल कुठलाही प्रतिसाद देत नव्हता. कसलीही हालचाल होत नसल्याने आईनं हंबरडा फोडला. हा आवाज ऐकून शेजारील लोक जमा झाले. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत मात्र निखिलचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed