हवामान विभागाकडून कोकणातील रायगड आणि रत्नागिरीला, तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच विदर्भात पावसाचा वेग मंदावला असला तरीही काही भागांत अजूनही पाऊस बरसण्याची शक्यता असून संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. राजधानी मुंबईतील तुरळीत ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पुण्यात आकाश ढगाळ, पावसाची कशी असेल स्थिती?
पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चौफेर हजेरी लावलेल्या पावसाचा जोर रविवारपासून ओसरणार आहे. पुढील दोन दिवस शहरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून दिवसभरात पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. मात्र, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, पुण्यात शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण आणि काळोख होता. दुपारी काही वेळ आणि संध्याकाळी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींनी हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा जाणवला. रात्री साडेआठपर्यंत शहरात १.२ मिलीमीटर पाऊस पडला. जिल्ह्यात आणि घाट माथ्यावर जोराचा पाऊस पडला. पुढील काही दिवस पावसाचा जोर आता ओसरणार असल्याने शेतकऱ्यांना आता शेतीची कामे पूर्ण करता येतील, असे आयएमडीने सांगितले आहे.
नाशिकमध्ये काय आहे स्थिती?
राज्याच्या बहुतांश भागात समाधानकारक पाऊस पडला असताना नाशिक जिल्ह्यात मात्र धुव्वाधार पावसाची अजूनही प्रतीक्षाच आहे. जिल्ह्यातील येवला, सिन्नर, मालेगाव तालुक्यातील अनेक भाग अजून कोरडा असला तरी शहर आणि जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यात पावसाने चांगला जोर पकडला आहे. चार दिवसांपूर्वीच पालखेड धरण समूहामधील दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.