७ जुलैला राष्ट्रपती शिर्डीला आल्या होत्या. त्यावेळी त्यांना जेवणात मेथी , मटकी, आलु जीरा ( सेंद्रीय ), चपाती, साध वरण – भात, गावरान तुपाचा शिरा, बटाटा वडापाव, सलाड,पापड आणि चटणी असा मराठमोळा मेनू देण्यात आला होता. त्यांना तो भावल्याने त्यांनी साईप्रसादालयातील आचाऱ्यांना दिल्लीला बोलावून घेतले आहे. त्यांचा तेथे सत्कारही केला जाणार आहे.
जुलैमध्ये शिर्डीला साई समाधीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या राष्ट्रपती मूर्मू यांनी हॉटेलमध्ये जेवण घेण्याऐवजी साईप्रसादालयातील साधे जेवण घेण्यास पसंती दिली होती. त्यानुसार व्हीआयपी प्रसादालयात त्यांच्यासाठी जेवण तयार करण्यात आले होते. साई समाधीचे भक्तीभावाने दर्शन घेतल्यानंतर त्या काही काळ भाविकांसोबत पायी चालल्या. त्यानंतर त्यांनी प्रसादालयात जाऊन जेवण घेतले. लाखो भाविकांना महाप्रसादरुपी जेवण देणाऱ्या शिर्डीच्या प्रसादालयात अत्याधुनिक साधनेही उपलब्ध आहेत. येथे बहुतांश स्थानिक स्वयंपाकी आहेत. राष्ट्रपतींना त्या दिवशी मराठमोठा मेनू द्यायचा असल्याने ती जबाबदारी वहाडणे आणि कर्डिले यांच्यावर सोपविण्यात आली होती. तेथे तयार केलेली शेंगादाण्याची चटणी त्यांना विशेष आवडली. त्यांनी तेथील स्वयंपाकी आणि कर्मचाऱ्यांकडे ही चटणी कशी तयार करतात, याची माहितीही घेतली होती. याशिवाय प्रसादालयाचे कामकाज पाहून त्यासंबंधीही त्यांनी जाणून घेतले होते. आता याच स्वयंपाकींना पुन्हा एकदा दिल्लीत राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींना आपल्या हातचे जेवण खाऊ घालण्याची संधी मिळाली आहे.