• Sat. Sep 21st, 2024

मोठी बातमी: डॉ. दत्ता सामंत हत्याप्रकरणात गँगस्टर छोटा राजनची निर्दोष मुक्तता

मोठी बातमी: डॉ. दत्ता सामंत हत्याप्रकरणात गँगस्टर छोटा राजनची निर्दोष मुक्तता

मुंबई: कामगार नेते दत्ता सामंत यांच्या हत्या प्रकरणातून कुख्यात गुंड छोटा राजनची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सबळ पुराव्यांअभावी विशेष सीबीआय न्यायालयाने छोटा राजन याची हत्येच्या आरोपातून सुटका केली. १६ जानेवारी १९९७ रोजी दत्ता सामंत हे जीपमधून पवईहून घाटकोपरकडे जात असताना विक्रोळी येथील पद्मावती रोडवर दुचाकींवर आलेल्या चौघांनी त्यांची जीप अडवली आणि त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करत त्यांची हत्या केली होती. दत्ता सामंत यांच्यावर हल्लेखोरांनी एकूण १७ गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन फरार झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर आणि मानेवर अनेक गोळ्या लागल्या होत्या. यानंतर डॉ. दत्ता सामंत यांना तातडीने उपचारासाठी नजीकच्या अनिकेत नर्सिंग होममध्ये नेण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दत्ता सामंत यांच्या हत्येमुळे त्यावेळी एकच खळबळ उडाली होती.

Crime Diary: छोटा राजनच्या लव्ह स्टोरीचं दाऊद कनेक्शन, लग्नानंतर का तोडली डॉनशी मैत्री; Inside Story

या घटनेनंतर डॉ. सामंत यांचा चालक भीमराव सोनकांबळे यांच्या फिर्यादीवरून साकीनाका पोलिस ठाण्यात चार अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी हल्लेखोर गणपत बामणे, विजय थोपटे आणि अरुण लोंढे या तिघांविरोधात खटला चालून सत्र न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्यांचे अपिलही मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावले होते. तर छोटा राजनचे २०१५मध्ये प्रत्यार्पण झाल्यानंतर दत्ता सामंत यांच्या हत्येशी संबंध असल्याच्या आरोपावरून सीबीआयने त्याच्याविरोधात खटला दाखल केला होता. मात्र, त्या हत्येच्या घटनेत छोटा राजनचा संबंध दाखवणारे ठोस पुरावे नसल्याचे निरीक्षण नोंदवत विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी त्याची सुटका केली. छोटा राजनला ऑक्टोबर२०१५ मध्ये इंडोनेशियातील बाली येथून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून छोटा राजन सीबीआयच्या कोठडीत आहे. त्यानंतर सीबीआयने छोटा राजन याच्यावर दाखल असलेल्या सर्व गुन्ह्यांच्या प्रकरणाचा तपास स्वत:कडे घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed