• Tue. Nov 26th, 2024

    कालबध्द वेळापत्रकाद्वारे अनुकंपा भरती प्रक्रिया राबवावी – विभागीय आयुक्त सौरभ राव

    ByMH LIVE NEWS

    Jul 28, 2023
    कालबध्द वेळापत्रकाद्वारे अनुकंपा भरती प्रक्रिया राबवावी – विभागीय आयुक्त सौरभ राव

    पुणे, दि.२८ :- शासकीय सेवेत कार्यरत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर ओढावणाऱ्या आर्थिक आपत्तीतून बाहेर काढण्यासाठी मदत म्हणून शासकीय कार्यालयातील रिक्त पदांवर अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येते. अनुकंपा नियुक्तीचे शासनाचे हे प्रयोजन लक्षात घेता अशाप्रकरणी नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी सहानुभूतीपूर्वक दृष्टीकोन ठेवून जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने प्रलंबीत प्रकरणे मार्गी लावावीत. जिल्हा प्रशासनानेसुध्दा कालबध्द वेळापत्रकाद्वारे विभागातील अनुकंपा भरती प्रक्रिया राबवून प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना त्वरीत नियुक्ती द्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले.

    विभागीय आयुक्तालयातून पुणे विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून अनुकंपा भरती प्रक्रियेचा आढावा घेताना ते बोलत होते. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, उपायुक्त सामान्य प्रशासन वर्षा लड्डा ऊंटवाल, उपायुक्त महसूल रामचंद्र शिंदे व अन्य विभागीय प्रमुख अधिकारी  यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
    पुणे विभागातील अनुकंपा तत्वावरील नियुक्ती प्रकरणे कालबध्द पध्दतीने व जलद गतीने पूर्ण होण्यासाठीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. अनुकंपा नियुक्तीच्या अनुषंगाने सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांशी संपर्क साधून सध्या अस्तित्वात असलेल्या प्रतीक्षा यादीनुसार गट क व ड संवर्गातील रिक्त पदांवर भरती प्रक्रिया तातडीने राबवावी, प्रत्येक वर्षी त्या-त्या संवर्गातील रिक्त पदांपैकी वीस टक्के पदांवर उमेदवारांना अनुकंपा नियुक्ती द्यावी, तांत्रिक पदावर नियुक्तीसाठी तांत्रिक अर्हता धारण करणाऱ्या उमेवारांना प्राधान्याने नियुक्ती द्यावी असे निर्देश त्यांनी यावेळी विभागातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले. शासन स्तरावर जलदगतीने अनुकंपा नियुक्तीसंदर्भात नियमित आढावा घेण्यात येत असल्याने विभागातील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना शंभर टक्के नियुक्ती देण्यात यावी अशी सूचना श्री.राव यांनी यावेळी केली.

    मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आढावा

    राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय शेतीसाठी वीज उपलब्ध व्हावी यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. विभागातील या योजनेचा आज विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यावेळी महावितरणचे विभागातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed