याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कामशेतचा मोठा बोगदा संपल्यानंतर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर ही दरड आल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे. खंडाळा घाटातील धोकादायक दगड काढण्याचे काम झाल्यानंतर आज दुपारी अडीच नंतर एक्सप्रेस वेची मुंबई मार्गिका सुरु करण्यात आली होती.
आता या घटनेमुळे मुंबई मार्गिका पुन्हा विस्कळीत झाली आहे. घटनेची माहिती समजताच एक्स्प्रेस वेवरील देवदूत यंत्रणा आणि आयआरबीचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मार्गावर आलेले दगड आणि माती बाजुला काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
बोरघाट येथे आज दरड काढण्यासाठी नुकताच १२ ते २ ब्लॉक घेण्यात आला होता. मुंबईकडे जाणारी संपूर्ण वाहतूक थांबवण्यात आली होती. ड्रिल मारून या दरडी आज पाडण्यात आल्या. नागरिकांना याचा कोणातही त्रास होऊ नये म्हणून प्रशासन सतर्क झाले आहेत. मात्र, आज संध्याकाळी पुन्हा दरड कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
दोन वर्षांत ६५ कोटींचा खर्च
पुणे-मुंबई द्रुतगतीवर दरड कोसळू नये म्हणून उपाययोजना केल्या जातायेत. गेल्या दोन वर्षात यासाठी तब्बल ६५ कोटींचा खर्च झालाय, २०१५ पासून हा आकडा १०० कोटींच्या आसपास झाला असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलीये. मार्गावर दरड कोसळू नयेत, म्हणून डोंगरांच्या कातळकडांना जाळ्यांचं संरक्षण देण्यात आलं आहे. पण या जाळ्या निकृष्ट दर्जाच्या होत्या असं रविवारी रात्री सिद्ध झालं. आता त्याच ठिकाणी पुन्हा नव्यानं जाळ्या लावल्या जात आहेत. या जाळ्या निकृष्ट दर्जाच्या नसाव्यात. अशी अपेक्षा प्रवासी करतायेत. पुन्हा या निकृष्ट कामाचा फटका सामान्यांना बसू नये, अशी माफक अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.