• Fri. Nov 29th, 2024

    चळवळीच्या इतिहासातील मोठा खुलासा! ५६ वर्षांत चकमकीत ठार झालेल्या माओवाद्यांच्या आकडा ऐकून शॉक व्हाल

    चळवळीच्या इतिहासातील मोठा खुलासा! ५६ वर्षांत चकमकीत ठार झालेल्या माओवाद्यांच्या आकडा ऐकून शॉक व्हाल

    म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली : सुरक्षा दलाच्या जवानांशी मागील ५६ वर्षांत झालेल्या चकमकींमध्ये १४ हजार ८०० माओवादी ठार झाल्याची कबुली खुद्द माओवाद्यांनीच पत्रकातून दिली आहे. चारू मुजुमदार, पेद्दी शंकर, किशन आझाद, रामकृष्णा यांच्यासह ४१ बड्या माओवादी नेत्यांचा यात समावेश आहे. मृतांमध्ये १ हजार १६९ महिला माओवादी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय समितीचा प्रवक्ता अभयने जारी केलेल्या या पत्रकातून चळवळीच्या इतिहासातील मोठा खुलासा केल्याची चर्चा यानिमित्ताने दंडकारण्यात होऊ लागली आहे.

    पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्याच्या नक्षलबारी गावातून चारू मुजुमदार यांनी नक्षलवादी चळवळीची सुरुवात केली. १९६७मध्ये सुरू झालेली ही चळवळ देशाच्या काही भागात पसरली. या चळवळीचा सर्वाधिक विस्तार मध्य भारतातील आंध्र प्रदेशात झाला. कोंडापल्ली सीतारामय्या यांनी ‘पीपल्स वार ग्रुप’ या नक्षलवादी संघटनेची स्थापना केली. १९७०च्या दशकात उस्मानिया विद्यापीठातून उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडलेले अनेक तरुण या संघटनेत दाखल झाले. १९८०च्या दशकात या संघटनेच्या माओवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यातून प्रवेश केला. यानंतर गडचिरोली, गोंदियासह लगतच्या चंद्रपूरचा काही भाग आणि छत्तीसगडमध्ये माओवादी चळवळ पसरली. पीपल्स वार ग्रुप आणि माओईस्ट कम्युनिस्ट सेंटर या दोन नक्षलवादी संघटनांचे २००४मध्ये एकीकरण होऊन भाकपा माओवादी ही नवी संघटना अस्तित्वात आली. त्यानंतर माओवाद्यांनी सुरक्षा दलाच्या विरोधात दंडकारण्यात आक्रमकता वाढवत हल्ले केले. मोठ्या संख्येत सुरक्षा दलाचे जवान शहीद झाले. त्यानंतर गडचिरोलीसह दंडकारण्यात सुरक्षा दलांनी माओवाद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. मोठ्या संख्येत माओवादी ठार झाले आहेत. माओवाद्यांच्या संघटनेला गेल्या दहा वर्षांत सर्वाधिक हादरे बसले असून संघटना आता कठीण परिस्थितीतून जात आहे. आंध्र प्रदेशात ही चळवळ मोडीत काढण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. तर गडचिरोलीसह लगतच्या बस्तरमध्ये मोठ्या संख्येत पोलिस ठाणे उभारण्यात आल्याने पोलिसांचा दुर्गम, अतिदुर्गम, अतिसंवेदनशील भागात वावर वाढला आहे. गडचिरोलीत माओवादविरोधी अभियानात पोलिसांना सर्वाधिक यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर १९६७-२०२३दरम्यान सुरक्षा दलाच्या चकमकीत ठार झालेल्या माओवाद्यांसंदर्भात चळवळीबद्दल मोठा खुलासा करणारे पत्रकच जाहीर केले आहे.

    नेत्यांचे जीवनचरित्र प्रकाशित करणार

    माओवादी संघटनेच्या केंद्रीय समितीचे सदस्य योगेशा, मिलिंद तेलतुंबडे, विजय (नारायण सान्याल) रमण्णा (रावुला श्रीनिवास), हरीभूषण, रामकृष्णा, विजय (श्रीधर श्रीनिवास), अरविंद (देवकुमार सिंह) या माओवादी नेत्यांचे जीवनचरित्र हिंदी, तेलुगू आणि इंग्रजी भाषेत प्रकाशित केले जाणार आहे. या माध्यमातून माओवादी चळवळीतील त्यांचे महत्त्व जगासमोर येणार, असा विश्वासही माओवाद्यांनी पत्रकातून व्यक्त केला आहे.
    Vidarbha Rain Forecast: विदर्भात आज अतिवृष्टी; हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज, रेड अलर्ट जारी
    चकमकींमध्ये ठार माओवाद्यांचा आकडा त्यांनी पत्रकातून दिला आहे. मात्र दंडकारण्यात अनेकानेक कारणांवरून लाखावर नागरिकांना देशाच्या विविध भागांत विस्थापित व्हावे लागले आहे. हजारो नागरिकांचे जीव गेले आहेत. या साऱ्यासाठी माओवादी जबाबदार आहेत. शोषित वर्गाला विकासाच्या प्रवाहात येण्यापासून माओवादी अडवित आहेत.- संदीप पाटील, पोलिस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed