मुंढवा पोलिस ठाण्याचे बिट मार्शल देवानंद खाडे आणि संदीप गर्जे गस्त घालत होते. मुंढवा चौकात एक ज्येष्ठ महिला त्यांना घाबरलेल्या अस्वस्थेत दिसून आली. खाडे आणि गर्जे यांनी महिलेची विचारपूस केली. घाबरल्याने महिलेला काहीच बोलता येत नव्हते. महिला रस्ता चुकल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. नाव काय आहे, कुठून आला आहात, अशी विचारणा केल्यावर त्यांनी नाव बेबी आहे आणि कसबा एवढेच सांगितले.
ज्येष्ठ महिलेची ओळख पटवण्यासाठी संपूर्ण नाव, पत्ता, आधार कार्ड, मोबाइल क्रमांक अशी कोणतीच माहिती पोलिसांकडे नव्हती. खडे आणि गर्जे यांनी महिलेला मुंढवा पोलिस चौकीत नेले. या घटनेची माहिती मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांना देण्यात आली. ज्येष्ठ महिलेने कसब्यात राहत असल्याचे सांगितले. ताम्हाणे यांनी फरासखाना पोलिसांना महिलेचे छायाचित्र पाठवून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. याचवेळी या महिलेचे कुटुंबीय तिला शोधत होते. ते तक्रार देण्यासाठी फरासखाना पोलिस ठाण्यात आले होते. महिला मुंढवा पोलिस ठाण्यात असल्याचे त्यांना सांगण्यात आले.
दरम्यान, जेष्ठ महिलेचे नाव बेबी मरियम अन्सारी (वय ७०) असल्याचे समजले. या जेष्ठ महिलेला कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार देवानंद खाडे, रमेश उगले, संदीप गर्जे यांनी ही कामगिरी केली.