मिळालेल्या माहितीनुसार, अनिल अंबादास माळवे (५१) रा. प्रकाशनगर मुकुंदवाडी असे अटक करण्यात आलेल्या कुख्यात गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर वेगवेगळे १६ गुन्हे दाखल आहेत. अनिल हा शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये राहणाऱ्या उच्चभ्रू वसाहतीतील अल्पवयीन मुलांना हेरत होता. या मुलांना अनिल चरस गांजा पुरवण्याचे काम करत होता. यामुळे मुलं व्यसनाधीनकडे वळली होती. एका मुलाला चरस गांजा पुरवल्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या अनेक मुलांना हेरण्याचे काम अनिल करत होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद येथील फार्म हाऊसवर शहरातील उच्चभ्रू वसाहतीतील अल्पवयीन मुलांची पार्टी झाली होती. या पार्टीमध्ये गेलेली अनेक अल्पवयीन मुले रात्री घरी परतलीच नाही.
या पार्टीमध्ये अनेक मुलांनी चरस गांजा सेवन केलं होतं. या पार्टीची माहिती छत्रपती संभाजीनगर पोलिसांना मिळाली होती. पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांना याची माहिती मिळाली. दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी पुंडलिक नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांना याची माहिती देत कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस आरोपीच्या शोधात होती. दरम्यान तपास करीत असताना अनिल माळवे हा यातील मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांना खात्रीलायक माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी सापळा रचून अनिल याला रंगेहात पकडले. पोलीस आयुक्तांच्या पथकाने एकाच वेळी चार ठिकाणी छापे टाकत ३ किलो ५० ग्राम गांजा, १.२ ग्रॅम एमडी, ४.५ ग्रॅम चरस जप्त केले आहे.
शहरातील उच्चभ्रू वसाहतीतील मुलांना चरस गांजाचे व्यसन लावणाऱ्या गुन्हेगारांचे मोठे जाळे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नारेगाव परिसरामध्ये एका संशयित आरोपीचा शोध सुरू आहे. पोलीस आयुक्तांच्या पथकाने केलेल्या या कारवाईमध्ये चरस, गांजा विकणारे अनेक मासे गळायला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त मनोज लोहिया, उपायुक्त शिलवंत नांदेडकर, सहायक आयुक्त रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजश्री आडे, एपीआय शेषराव खटाने, पीएसआय संदीप काळे, दिपक देशमुख, जालिंधर मांटे, ललिता गोरे, संतोष पारधे, संदीप बिडकर, कल्याण निकम , भागीनाथ सांगळे, भीमराव राठोड, योगेश चव्हाण यांनी केली.