• Fri. Jan 10th, 2025

    पालघरमध्ये लवकरच ५० खाटांचे आयुर्वेद रुग्णालय; राष्ट्रीय आयुष्यमान अभियानाअंतर्गत मंजुरी

    पालघरमध्ये लवकरच ५० खाटांचे आयुर्वेद रुग्णालय; राष्ट्रीय आयुष्यमान अभियानाअंतर्गत मंजुरी

    नरेंद्र पाटील, पालघर : जिल्ह्याला केंद्र व राज्य सरकारच्या राष्ट्रीय आयुष अभियान प्रकल्पांतर्गत ५० खाटांचे एकात्मिक आयुष आयुर्वेद रुग्णालय मंजूर झाले असून हे रुग्णालय उभारण्यासाठी सहा एकर जमिनीच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठवण्यात आला आहे. रुग्णालयामार्फत जिल्ह्यातील अडीच लाख लोकसंख्येला आरोग्यसेवा पुरविली जाणार आहे.

    राष्ट्रीय आयुष्मान अभियानांतर्गत एकात्मिक आयुष आयुर्वेदिक रुग्णालय पन्नास खाटांचे असून या रुग्णालयाकरिता इमारत, निवासस्थान, फर्निचर, साहित्य, उपकरण, आयटी यंत्रणा यासाठी १५ कोटी रुपयांच्या निधीला मिळाली आहे. या रुग्णालयासाठी सहा एकर जागेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर लागलीच पावसाळ्यानंतर रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत नियोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

    राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत मंजूर करण्यात आलेले एकात्मिक आयुष आयुर्वेदिक हे रुग्णालय जिल्ह्याच्या ठिकाणी पालघर नगर परिषद क्षेत्रात उभारण्यात येणार आहे. ह्या आयुर्वेदिक रुग्णालयाबरोबरच राष्ट्रीय आयुष अभियान प्रकल्पांतर्गत या ठिकाणी होमिओपॅथी आरोग्य सुविधाही उपलब्ध करण्यात येणार आहे. आयुर्वेदावरदेखील या ठिकाणी संशोधन करण्याचा प्रस्ताव असून त्यादृष्टीने प्रयत्न चालू असल्याचे सांगण्यात आले.

    रुग्णालयासाठी जमीन मागणीच्या प्रस्तावामध्ये रुग्णालयात एकूण पाच वार्ड रुग्णांसाठी तयार करण्यात येणार असून त्यापैकी चार वार्डमध्ये प्रत्येकी दहा बेड असणार आहेत, तर खाजगी बेडसाठी एक वॉर्ड असणार आहे. पॅथॉलॉजिकल लॅबदेखील असणार आहे. या ठिकाणी रुग्णांच्या विविध तपासण्या करण्यात येणार आहेत. क्लिनिकल लॅबोरेटरी आणि इन्व्हेस्टिगेशन, ऑपरेशन थिएटर व साईड थेटर, फिजिओथेरपी अँड इलेक्ट्रो थेरेपी, फिजिओथेरपी अँड इलेक्ट्रो इन्फ्रारेड थेरेपी, हायड्रोथेरेपी, पंचकर्म थेरेपी, योगा व नॅचरोपथी, आयुर्वेदिक होमिओपॅथी निदान, प्रसूती विभाग, मेडिकल स्टोअर, रुग्णांसाठी वेटिंग हॉल, कॅज्युअलिटी रूम, आदी सुविधा रुग्णांना मिळणार आहेत

    या रुग्णालयात अधिकारी व कर्मचारी निवासी संकुल, कर्मचारी व येणारे रुग्ण यांच्या वाहनांसाठी वाहनतळ, आयुष हर्बल गार्डन, योग उपचारासाठी जागा अशी एकूण सहा एकर जागेची आवश्यकता असल्याने जागेच्या मागणी करता शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे

    पालघर नगरपरिषद कार्यक्षेत्रात लाखभर वस्ती असून परिसरातील गावांत दोन ते अडीच लाखाहून अधिक लोकवस्ती आहे. या लोकवस्तीला या रुग्णालयाचा मोठा फायदा होणार आहे. आयुर्वेदिक उपचार पद्धतीकडे कल असलेल्या रुग्णांना याचा फायदा होणार असून या ठिकाणी आयुर्वेदातील व होमिओपथीमधील तज्ज्ञ डॉक्टर नर्सेस व कर्मचारी यांच्यातर्फे रुग्णांवर उपचार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
    राज्य सरकारचा मोठा निर्णय! आता ‘या’ आजाराने त्रस्त प्रवाशांना एसटीचा मोफत प्रवास
    स्थानिक औषधांचा अभ्यास

    पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा असून या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी आणि ग्रामीण भागामध्ये आयुर्वेदाचे पारंपरिक ज्ञान आहे. त्याचा फायदा या आयुर्वेदिक कॉलेजला उभारणी करताना होणार असून आयुर्वेदिक औषधासाठी ग्रामीण भागातील कोणत्या तालुक्यातील व कोणत्या गावातील नागरिक कोणत्या प्रकारचे औषध निर्माण करतात, त्याचाही अभ्यास होऊन या भागातील अशा औषधी गोळा करणाऱ्या नागरिकांना रोजगाराच्या दृष्टीने उपयोग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed