कुठल्याही पक्षातील लोकांना आपलाच नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे, असे वाटणे साहजिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला वाटू शकतं, अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं. आमच्या लोकांना वाटू शकतं, भाजपचा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे. यामध्ये वावगं काहीही नाही. मात्र, मी पूर्ण अधिकृतपणे या महायुतीमधील सर्वात मोठा पक्षाचा नेता म्हणून सांगतो की, या महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच राहतील. दुसरा कोणीही मुख्यमंत्री होणार नाही. मुख्यमंत्री पदामध्ये कोणताही बदल होणार नाही. अजित पवार आणि माझ्या मनात याबाबत स्पष्टता आहे. महायुतीची चर्चा झाली तेव्हाच अजितदादांना कल्पना देण्यात आली होती आणि ती गोष्ट त्यांनी स्वीकारली आहे. त्यांनीही आपल्या वक्तव्यामध्ये, मुख्यमंत्री बदलाची चर्चा नाही, हे स्पष्ट सांगितले होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आजच प्रसारमाध्यमांशी बोलताना, एकनाथ शिंदे यांना १० ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागेल, त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील, असे भाकीत वर्तविले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांचा हा दावा फेटाळून लावला. सध्या पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखी पतंगबाजी अनेकजण करत आहेत. अनेक लोक राजकीय भविष्यवेत्ते झाले आहेत. पण त्यांनी कितीही भविष्य सांगून कितीही संभ्रम निर्माण केला तरी मी अतिश्य स्पष्टपणे आणि पूर्ण अधिकृतपणे सांगतो की, १० तारखेला, ११ तारखेला किंवा ९ तारखेला काहीही होणार नाही. काही झालचं तर आमचा मंत्रिमंडळ विस्तार होईल. मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख मुख्यमंत्री हेच ठरवतील, त्यानुसार मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.