• Sat. Sep 21st, 2024

भाजप-राष्ट्रवादीच्या मैत्रीला पालवी फुटली, दादांच्या विधानसभेचं गणित सोपं पण पालिकेत संघर्ष!

भाजप-राष्ट्रवादीच्या मैत्रीला पालवी फुटली, दादांच्या विधानसभेचं गणित सोपं पण पालिकेत संघर्ष!

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड करत शिंदे-भाजप सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आत्तापर्यंत एकमेकांच्या विरोधात लढलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मनोमिलन कारण्याची वेळ आली आहे. त्यात राज्यात काही ठिकाणी खटके उडत असल्याचे देखील पाहायला मिळाले आहे. मात्र पुण्यात आता भाजप आणि राष्ट्रवादीच्या मैत्रीचा नवा अध्याय सुरु झाला आहे. आज पुण्यात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी भाजप नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर भाजप आणि राष्ट्रवादीत खरं युद्ध असणाऱ्या पुण्यात आता भाजप-राष्ट्रवादीच्या मैत्रीला नवी पालवी फुटत आहे.

अजित पवार यांनी बंड केल्यानंतर त्यांनी पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारी माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्यावर सोपवली आहे. त्यानंतर आता त्यांनी भाजपशी जुळवून घेण्यास सुरवात केली आहे. आज मानकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दीपक मानकर यांची शहराध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल विशेष सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर हे देखील उपस्थित होते.

दीपक मानकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कोथरूडचे बडे नेते आहेत. तर चंद्रकांत पाटील हे कोथरूड विधानसभा मंतदारसंघाचे आमदार आहेत. त्यामुळे मानकर-पाटील भेटीने आता कोथरूड विधानसभा मतदार संघातील गणिते भाजपसाठी आणखी सोपे झाले आहेत असं राजकीय जाणकारांचं मत आहे. तर दुसरीकडे काही महिन्यात येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर देखील मानकर-पाटील यांच्या भेटीने वातावरण बदलले आहे.

पुण्यात महापालिका निवडणुकीत खरी लढाई भाजप आणि राष्ट्रवादीत होती. त्यात आता अजित पवार यांनी भाजप सोबत जात सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्याने पुण्यात मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. कोणत्या प्रभागात कोणत्या पक्षाची ताकद जास्त आणि जागा वाटप यावरून राष्ट्रवादी-भाजपात वातावरण गरम असताना भाऊ-दादांच्या या भेटीमुळे या गरम वातावरणात तात्पुरता तरी गारवा जाणवेल हे नक्की. आता या दोन्ही नेत्यांच्या भेटीने भाजप-राष्ट्रवादीने पुण्यात जुळवून घेण्यास सुरवात केलीय हे नक्की….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed