• Wed. Mar 18th, 2026
    Lightning Strike : सांगलीत घरावर वीज कोसळली, अवकाळी पावसाचा धुमाकूळ

    सांगलीत आज मोठी दुर्घटना घडली आहे. जतच्या घोलेश्वर या परिसरात एका घरावर वीज कोसळली. या घटनेत सुदैवाने कुणी जखमी झाले नाही. पण या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सांगली : राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचे रौद्र रुप बघायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळीने धुमाकुळ घातलेला बघायला मिळत आहे. सांगली इथे तर मोठा अनर्थ घडला असता. पण सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. सांगलीच्या जत तालु्क्यात घोलेश्वर इथे एका घरावर थेट वीज कोसळली आहे. त्यामुळे घराच्या छप्परला थेट आग लागली. या आगीत घराचं छप्पर बेचिराख झालं आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. घटना घडली त्यावेळी घरात कुणी नसल्यामुळे नागरिकांचे प्राण बचावले आहेत. पण सांगलीत आज विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडलेला बघायला मिळाला. या पावसामुळे शेतीच्या पिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी गारांचादेखील पाऊस पडला आहे.

    सांगलीच्या जत तालुक्यातील घोलेश्वर येथे छप्पर वजा राहत्या घरावर वीज पडली. यावेळी घोलेश्वरमध्ये विजेचा तांडवच पहायला मिळाला. विजेमुळे लागलेल्या या आगीचे हे रौद्ररूप पाहून परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली. या घटनेत पती-पत्नी घराच्या बाहेर असल्याने मोठा अनर्थ टळला.

    दोन दिवसांपासून तालुक्यात कडाक्याची वीज आणि गारांच्या अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. सोसाट्याचा वारा, गारांचा पाऊस आणि विजेमुळे मोठे नुकसान होत आहे. आजही सायंकाळी जोराचा वारा, अवकाळी पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू झाला.

    गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तालुक्यात विजांचा कडकडाट आणि पावसाची जोरदार सुरुवात झाली होती. याच दरम्यान साडेसात वाजण्याच्या सुमारास घोलेश्वर येथील आटपाडकर यांच्या घरावर अचानक वीज कोसळली. विजेच्या तडाख्याने घराला काही क्षणात आग लागली. ही आग इतकी भयानक होती की काही कळायच्या आत संपूर्ण घर जळून खाक झाले. या आगीत आटपाडकर यांच्या घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून नष्ट झाले. घटनास्थळी ग्रामस्थानी मोठी गर्दी केली होती.

    जत तालुक्यातील डफळापूर परिसरात अवकाळी पाऊस

    सांगलीच्या जत तालुक्यातील डफळापूर येथील चव्हाण वस्ती, जमखडीकर वस्ती येथे सायंकाळी तुफान वादळी वाऱ्यासह गारपीटाचा पाऊस पडला. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. द्राक्ष, गहू, ज्वारी, आंबा फळपिके याचे नुकसान झाले आहे. जतच्या डफळापुर परिसरामध्ये सायंकाळच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि अवकाळी पावसाला सुरुवात झाली. यावेळी काही ठिकाणी गाराही पडल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची आणि ग्रामस्थांची दैना उडाली. या अवकाळी पावसामुळे पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा