• Sat. Sep 21st, 2024
घराला पुराचा वेढा, तिघेजण १५ तास पत्र्यावर अडकले, अग्निशमन दलाची प्रयत्नांची शर्थ, एसडीआरएफ पथक आले अन्…

नांदेड: मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला आहे. या पुरात माहूर तालुक्यातील टाकळी येथील एकाच कुटुंबियातील तीन जण मागील १५ तासापासून अडकले होते. शनिवारी एसडीआरएफच्या पथकाने रेस्क्यू ऑपरेशन राबवत अवघ्या अर्धा तासात त्या तिघांची सुखरूप सुटका केली. त्यानंतर पुराच्या या संकटातून बचावल्याने कुटुंबियांतील सदस्यांना अश्रू अनावर झाले होते.
कोल्हापूर जिल्ह्यासाठी पुढील पाच दिवस महत्वाचे! पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ सुरूच, चिंता वाढली
मिळालेल्या माहितीनुसार, माहूर तालुक्यातीस टाकळी शिवारात रामचंद्र भागवत भंडारे (२९), भागवत रामचंद्र भंडारे (७५) आणि भाग्यश्री रामचंद्र भंडारे (२५) हे शुक्रवारी रात्रीपासून शेतातील आखाड्यावर पुराच्या वेढ्यात अडकून पडले होते. रात्रभर ते शेतातील घराच्या पत्र्यावर थांबले होते. तब्बल १५ तास तिघेजण पुरात अडकून पडले होते. शुक्रवारी सकाळी गावकऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. प्रशासन आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचून मदत कार्याला सुरुवात केली. परंतु त्यांना शक्य होत नव्हते. पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यांना बचावकार्य करण्यास अडथळा निर्माण होत होता.

अखेर नांदेडहून एसडीआरएफची टीम माहुरकडे पाचारण करण्यात आली. एसडीआरएफच्या टीमने बोटीच्या सहाय्याने अवघ्या तीस मिनिटात तिघांची सुखरूप सुटका केली आणि त्यांना पुरातून बाहेर काढले. नांदेड जिल्ह्यात मागील २४ तासात ४९.५० मिली मीटर पाऊस झाला असून १३ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी रात्री किनवट आणि माहूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. मागील २४ तासात किनवटमध्ये १५० मिली मीटर आणि माहूर तालुक्यात १८६ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.

यवतमाळमधील गावांना पुराचा वेढा, अडकलेल्या बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत

या पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीला पूर आला आहे. किनवटमधून विदर्भाकडे जाणारा खरबी, दराटी मार्गे उमरखेडला खरबी पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. या पुराचे पाणी किनवटमधील नालागड्डा, मोमीनपूरा, गंगानगर आणि रामनगरच्या काही भागात पूराचे पाणी शिरल्याने जिल्हा प्रशासनाने बचावकार्य राबवत ८० कुटुंबांना उर्दू शाळेत स्थलांतरीत केले आहे. शेताचे देखील मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, माहूर तालुक्यातून विदर्भाला जोडणाऱ्या धानोडा पुलावरून पैनगंगा नदीचे पाणी वाहत असल्याने माहूर ते यवतमाळकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed