• Sat. Sep 21st, 2024
२०१९ ला वचपा काढत कोठडीतून आमदार, पण आता भाजपकडून अडचणीत वाढ!

परळीच्या थर्मल प्लांटवर काम करणारा आठवी शिकलेला एक मजूर… नाव रत्नाकर गुट्टे… साखर कारख्यान्यातून व्यवसायात आणि व्यवसायातून राजकारणात उतरलेल्या याच व्यक्तीला भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे तुरुंगवास झाला… तरीही गुट्टेंनी गंगाखेडच्या राजकारणात भक्कम पाय रोवले. २०१४ ला रासपच्या तिकीटावर गुट्टेंनी विधानसभा निवडणूक लढवली पण त्यात त्यांचा पराभव झाला. पण चर्चा तर तेव्हा झाली जेव्हा, २०१९ ला तुरुंगवासात असताना विरोधकांना धुळ चारली आणि रासपच्या उमेदवारीवर विजयाचा भंडारा उधळला… इडी, सीबीआयच्या रडारवर असताना जेलमधून आमदार झालेल्या गुट्टेंची सर्वत्र चर्चा झाली. गुट्टे हे तसे फडवणीसांचेही निष्ठावंत… पण त्यांनाच घेरण्यासाठी भाजपने एक नवा डाव टाकलाय. गुट्टेंच्या मतदारसंघात नेमकं काय घडलंय? २०२४ च्या निवडणुकीआधीच गुट्टेंची कशी अडचण वाढलीये ते जाणून घेऊयात

शेतकऱ्यांच्या नावे हजारो कोटींची कर्ज उचलल्या प्रकरणी जून २०१९ ला गुट्टेंना अटक झाली. मात्र, इथूनच त्यांनी विधानसभेसाठी निवडणुकीचा अर्ज भरला. या निवडणुकीत मोठा घोडेबाजार आणि पैशाचा पाऊस पाडल्याचा आरोप विरोधकांनी केला. अनेकजण पैसे घेताना कॅमेऱ्यातही कैद झाले, पण हे पैसे गुट्टेंनीच दिले हे सिद्ध होऊ शकलं नाही. २४ ऑक्टोबरला निकाल लागला, ज्यात ८० हजार ६०५ विक्रमी मतं मिळवत गुट्टे विजयी झाले. शिवसेनेच्या विशाल कदम यांचा त्यांनी १८ हजार ८९६ मतांनी पराभव केला. कोठडीत राहून निवडणूक जिंकल्यानं गुट्टे चर्चेत राहिले. मात्र आता….

>रत्नाकर गुट्टे यांना त्यांच्याच मतदारसंघांमध्ये भाजपने घेरण्याचा प्रयत्न केलाय.
>याच मतदारसंघांमधून भाजपचे विधानसभेचे संभाव्य उमेदवार मानले जाणाऱ्या
>संतोष मुरकुटे यांच्यावर भाजपाच्या परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवलीये.
>मुरकुटे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने आता भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालंय.
>२०२४ ला गंगाखेडमधून भाजप निवडणूक लढवणार असल्याची घोषणा भाजपा पदाधिकाऱ्यांनी केलीये.
>त्यामुळे २०२४ ला भाजप विरुद्ध रासप असा संघर्ष होणार असल्याची मतदारसंघात चर्चा सुरु

याआधी असलेल्या जिल्हाध्यक्ष सुभाष कदमांची सातत्याने रत्नाकर गुट्टेंशी जवळीक वाढल्याने या मतदारसंघांमध्ये भाजपचे काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये संतोष मुरकुटे यांचा वेगळा पॅनल होता तर सुभाष कदमांनी रत्नाकर गुट्टे यांच्या पॅनलसोबत राहण्याची भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे एकप्रकारे मुरकुटे यांच्या खांद्यावर आता जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपवून भाजपने गंगाखेड विधानसभा मतदारसंघ लढवणार असल्याचे संकेत दिलेत. आता आगामी काळात….

मतदारसंघात २०२४ च्या लढतीचं गणित काय?

>या मतदारसंघात पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग
>रत्नाकर गुट्टे आणि भाजप जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे हे दोघेही वंजारी समाजातून येतात
>आगामी काळता गुट्टे विरुद्ध मुरकुटे अशी लढत झाल्यास मत विभाजन होण्याची शक्यता
>गुट्टेंना आव्हान देण्यासाठी आणखी तीन उमेदवार मैदानात असतील
>अजितदादा गटाकडून डॉ. मधूसुदन केंद्रे हे उमेदवार, जे धनंजय मुंडे यांचे मेहुणे आहेत.
>पवार गटाकडून माजी आमदार सिताराम गंडक हे उमेदवार असतील.
>तर बी.आर.एस कडून भगवान सानप यांची नाव चर्चेत, जे तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य

त्यामुळे २०२४ ची निवडणूक गुट्टे यांच्यासाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता नाकारत येत नाही. २०१९ ला जी वंजारी समाजाची मते गुट्टे यांना मिळाली होती त्यात देखील फूट पडू शकते. इतर समाजातील मते देखील भाजपाच्या उमेदवाराला मिळू शकतात. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत नेमकं काय होतं? भाजपने टाकलेल्या सापळ्यात गुट्टे अडकतात की गंगाखेडवर पुन्हा वर्चस्व कायम राखतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed