पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे सोलनपाडा हे धरण पूर्णपणे भरून वाहत आहे. पावसाचे प्रमाण वाढले तर धरण ओसांडून वाहू शकते या भीतीनेच प्रशासनाने गावातील ३१ कुटुंबांना स्थलांतरित केले आहे. तसेच इर्शाळवाडी येथे उद्भवलेली परस्थिती पुन्हा उद्भवू नये ह्या भीतीपोटी सोलनपाडा धरणातील पाणी ओढे नाले अशा ठिकाणी सोडण्याची तयारी प्रशासनाने केली असून हे धरणाची पाण्याची पातळी १ मीटर ते ९ मीटर कमी करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. रविवारी दुपार पर्यंत हे पाणी कमी करण्यात येणार असल्यामुळे गावातील रहिवाशांच्या जीवाला धोका नसल्याचे प्रशासनाने सांगितली आहे.
सोलनपाडा धरणाची या अगोदरही गळती रोखण्यासाठी दुरुस्तीचे काम केले होते. सोलनपाडा धरणाला लागलेल्या गळतीमुळे प्रशासनाने पटापट निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. रविवारी २३ दुपारपर्यंत या धरणातील काही पाण्याचा भाग कमी करण्यात येणार आहे. प्रशासन योग्य त्या उपाययोजना राबवणार आहे. तसेच या संपूर्ण परिस्थितीबाबत बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीमध्ये सोलनपाडा धरणाला लागलेली गळती पाहता गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
संबंधित प्रशासनाने हा अहवाल विचारात घेतला असून पुढे पाठवला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जांभरुख भागामध्ये ३१ कुटुंबे राहात असून या ठिकाणची लोकसंख्या ही १४२ आहे. सोलनपाडा धरणाला गळती लागताच प्रशासनाने घेतलेल्या संपूर्ण निर्णयाला नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या धरणातील पाणीसाठा उद्यापर्यंत कमी करून नागरिकांना दिलासा देण्याचे काम प्रशासन करणार आहे. प्रशासनाने तातडीने घेतलेल्या निर्णयामुळे सोलनपाडा धरणाच्या आजूबाजूला असलेल्या नागरिकांच्या जीवाचा धोका टळला आहे.