हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ३-४ तासांत मुंबई, ठाणे, धुळे, नंदुरबार, बीड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर रायगड, जळगाव, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, जालना, सिंधुदुर्ग आणि घाट परिसरात पुढील ३-४ तासांमध्ये मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाटा अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना खबरदारी घ्या, असं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान, आता वीकेंड आला असून अनेकजण फिरण्यासाठी बाहेर पडतात. पण हवामान खात्याकडून सगळ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण, राज्यात सर्वत्र सुरू असलेल्या पावसाचा जोर पुढचे दोन दिवस कायम असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोकणासह संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर मान्सून सक्रिय आहे. यामुळे मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, पालघर आणि घाट भागात आयएमडीकडून अतिवृष्टीचा अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे शक्यतो आठवड्याच्या शेवटी घरीच रहा, अशा सूचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत. अशात पुढील तीन ते चार तासांमध्ये मुंबईसह ठाणे, रायगडमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली काळजी घ्यावी.