मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी इर्शालवाडी दुर्घटनेवर देखील भाष्य केले. इर्शाळवाडी या ठिकाणी जी दुर्घटना घडली आहे त्या ठिकाणी कुठलीही यंत्रसामग्री पोहोचत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मातीच्या ढिगार्याखाली दबलेले मृतदेह अत्यंत कुजलेल्या तसेच खराब अवस्थेत सापडत असल्याने याठिकाणी खोदकाम हे थांबावाव अशी स्थानिक लोकांची मागणी आहे. त्या पार्श्वभूमीवर मी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे. मुख्यमंत्री लवकरच त्या स्थानिक लोकांच्या मागणीनुसार योग्य त्या सूचना प्रशासनाला करतील, असे ते म्हणाले.
२०२१ पर्यंत अशा पद्धतीच्या घटना घडल्या की त्या घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी कार्यवाही केली जात होती. तसेच पुनर्वसनाचे कामही केलं जात होतं. मात्र २०२१ नंतर शासनाचा आदेश आहे की अशा काही वस्तू किंवा वाड्या असतील तर त्याबाबतचा प्रस्ताव हा जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्रालयाकडे पाठवावा त्यानुसार त्यावर कार्यवाही करण्यात येईल, त्यामुळे इर्शालवाडी सारख्या दुर्घटना या भविष्यात होणाऱ्या अशा पद्धतीच्या टाळता येतील, असे ते पुढे म्हणाले.
यवतमाळमधील मदतकार्याला हेलिकॉप्टरची मदत घेऊ- पाटील
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्याजवळ तीन नद्यांचा संगम आहे आणि या नद्यांनी अतिवृष्टीमुळे धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे ४५ लोक हे नदीच्या पलीकडच्या बाजूला अडकले आहेत. मदत आणि पुनर्वसन विभागांतर्गत नियत्रंण कक्षातून सातत्याने त्या ठिकाणी लक्ष ठेवले जात आहे. जिल्हाधिकारी तसेच प्रशासनाचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले आहेत. एसडीआरएफच्या दोन तुकड्या त्या ठिकाणी पोचलेले आहेत व त्यांच्याकडून बचाव कार्य सुरू आहे. दोन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून लवकरात लवकर अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं जाईल असे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी बोललो आहे, असे पाटील म्हणाले.