इर्शाळवाडीतील ४६ घरांपैकी १७ ते १८ घरांवर २० जुलै रोजी दरड कोसळली होती. तेव्हा वाडीत २३१ नागरिक होते. यापैकी २४ जणांचा मृतदेह सापडला आहे. अजूनही १०५ जण बेपत्ता आहेत. आज उद्धव ठाकरे यांनी वाडीला भेट दिली आणि ग्रामस्थांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी दुर्घटनेतून बचावलेल्याचे सांत्वन केले. गावाचे पुनर्वसन होण्यासाठी हवी ती मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. यासाठी गरज लागली तर मी स्वत:सरकारकडे जायला तयार आहे. यासाठी मला कोणताही कमीपणा येणार नाही. मी सरकारकडे जनेतेच्या दृष्टीकोनातून पाहतो असे ठाकरे म्हणाले. याच बरोबर राज्यात अशी परिस्थिती ज्या ज्या ठिकाणी आहे त्या वाडी, वस्तीचे पुनर्वसन व्हायला पाहिजे. तीन ते चार वस्त्या मिळून एखादे गाव वसवले पाहिजे. या लोकांसाठी पंतप्रधान आवास योजना लागू करावी अशी मागणी त्यांनी केली. कोणतेही सरकार आले तरी या योजनेला स्थगिती देऊ नये असे ही ते म्हणाले.
आम्ही तुमच्या मदतीला…
जोपर्यंत वाडीतील सर्वांचे पुनर्वसन होत नाही. तुमचे आयुष्य मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही सगळे तुमच्या मदतीला आहेत असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. यात कोणतेही राजकारण येऊ देणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांना सांगितले. ग्रामस्थांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. देशाला स्वतंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली तरी अनेक आदिवासी जमातींना अशा प्रकारे जगावे लागत आहे. त्यांना प्रवाहात आणण्याची गरज असल्याचे ठाकरे म्हणाले.