मुसळधार पाऊस सुरू झाला की राज्यातील अनेक ठिकाणी भूस्खलनाचा धोका वाढत असतो. नुकत्याच रायगडमध्ये इर्शाळवाडीची घटना असो किंवा माळीनची घटना, संपूर्ण गाव काही क्षणात ढिगार्याखाली दबला गेला आणि राहिले त्या फक्त आठवणी. इस्त्रोने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या लँडस्लाईड ॲटलास अहवालात देशातील भूस्खलनाचा अधिक धोका असलेल्या आणि लोकसंख्येची प्रमाण जास्त असलेल्या १४७ जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध केलीय. यामध्ये राज्यातील ११ जिल्हे असून यामध्ये सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, रत्नागिरी, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, मुंबई आणि मुंबई उपनगर, ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे.
इस्रोने प्रसिद्ध केलेल्या लँड स्लाईड अटलास अहवालानुसार धोक्याच्या दृष्टीने कोणते जिल्हे कोणत्या स्थानी आहेत हे दिले आहे. त्यानुसार
सिंधुदुर्ग – ११४ व्या स्थानी
नाशिक मधील – १२८ व्या स्थानी
रत्नागिरी जिल्ह्यातील – १२९ व्या स्थानी
अहमदनगर मधील – १३१ व्या स्थानी
कोल्हापूर जिल्ह्यातील – १३३ व्या स्थानी
सातारा जिल्ह्यातील – १३४ व्या स्थानी
मुंबई सबर्न मधील – १३९ व्या स्थानी
आणि
मुंबई – १४० व्या स्थानी
तर कोल्हापूर जिल्ह्यात १३३ व्या स्थानावर असून जिल्ह्यातील ७६ गावांना भूसखलनाचा धोका आहे. ज्यामध्ये जिल्हयातील करवीर, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी, आजरा, कागल, चंदगड, गगनबावडा या तालुक्यातील अनेक गावांचा समावेश आहे
या गावातील ग्रामपंचायतीतर्फे गावातील लोकांनी स्थलांतर करावे यासाठीची नोटीस देखील देण्यात आली आहे. मात्र नागरिक आपलं राहतं घर सोडून जाण्यास तयार नसून स्थलांतर करायचं असेल तर ते कायमस्वरुपी करा अशी मागणी गावकरी करत आहेत.
सध्या या गावात गेल्या ४ दिवसांपासून वीजही नसल्याने गावकऱ्यांना रात्र अंधारात आणि भीतीच्या सावटाखाली काढण्याची वेळ आली असून देव करो इर्शाळवाडी आणि माळीन गवांसारखी दुर्घटना न घडो, असे लोक म्हणत आहेत. शासनानेही वेळीच पाऊल उचलण्याची गरज आहे. कोल्हापुरातील या गावासारखी अनेक गावं आणि गावातली माणसं पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन जगत आहेत.