हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या ३-४ तासांत नांदेड जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना/विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना खबरदारी घ्या, असं आवाहन करण्यात आलं आहे.
पुढच्या काही तासांमध्ये जळगाव जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना/विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर रायगड, ठाणे, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड, रत्नागिरी, औरंगाबाद, घाट परिसरात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाच्या मध्यम सरी पडण्याची शक्यता असून पुढील ३-४ तासांत पुणे आणि साताऱ्यामध्ये तुफान पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, आगामी ४ ते ५ दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे कोकणातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.