इर्शाळवाडीचा गावकरी काय म्हणाला?
शासनानं बाहेर राहण्याचे आदेश दिलेले, त्यानंतर गाववाल्यांनी फॉरेस्टच्या जागेत झोपड्या बांधल्या होत्या. फॉरेस्टवाल्यांनी त्या झोपड्या तीन चार वेळा मोडल्या. झोपड्या मोडल्या गेल्यानं लोक पुन्हा राहत्या घरी वास्तव्यास निघून गेले.
आमचे लोक झोपड्या बांधलेल्या तिथं राहिले असते तर लोकं तिथं राहायला गेली नसती, असं इर्शाळवाडीच्या ग्रामस्थानं म्हटलं. “लाज वाटायला पाहिजे होती फॉरेस्ट वाल्यांना, तुमची जागा विकत नेली असती का?, पावसाळ्यापुरते राहिले असते, नंतर गेले असते ना राहायला” असं म्हणत इर्शाळवाडीच्या गावकऱ्यानं टाहो फोडला.
वनविभागाच्या भूमिकेकडे लक्ष
इर्शाळवाडीच्या ग्रामस्थानं वनविभागाला या घटनेला जबाबदार धरलं आहे. आता वनविभाग या घटनेसंदर्भात काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी तळ ठोकला
राज्यात काल पावसानं जोरदार हजेरी लावली होती. रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट देण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला होता. इर्शाळवाडीची घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळीच इर्शाळवाडीत पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी या घटनेतून बचावलेल्या गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. दुपारच्या सुमारास पायी चालत जाऊन एकनाथ शिंदे घटनास्थळी पोहोचले.