सांगली जिल्ह्यात दडी मारलेल्या मान्सूनच्या पावसाने आज पासून चांगली हजेरी लावली आहे. जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांत दिवसभर रिमझिम पाऊस सुरूच होता. अनेक ठिकाणी संततधार पाऊस सुरू होता. पेरणीसाठी सुमारे तीन लाख हेक्टर क्षेत्र आहे. मात्र,पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या होत्या. पाऊस सुरु झाल्याने जिल्ह्यात पेरण्यांना गती येणार असल्याचे चित्र दिसत आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे.
कोयना आणि वारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तर अतिवृष्टी झाल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत वारणा धरण क्षेत्रात १४.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात सर्वाधिक ३६.३ मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली आहे. सांगलीतील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाजवळ पाण्याची पातळी ही ७ फुटांवर जाऊन पोहोचली आहे. सांगली महापालिका क्षेत्रात काल रात्रीपासून पाऊसाची संततधार सुरू असल्याने अनेकठिकानी पाणी साचले असून उपनगरांमध्ये चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस..
जिल्ह्याचा पश्चिम भाग असणाऱ्या शिराळा तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. संततधार पडणाऱ्या पाऊसमुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. नदीवरील कोकरूड रेठरे हा बंधारा पाण्याखाली गेला आहे. बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागल्याने सांगली जिल्ह्याचा कोल्हापूर जिल्ह्यातील गावांशी संपर्क तुटला आहे.
पावसाचं कमबॅक पेरण्यांना वेग येणार
राज्यासह सांगली जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पावसाचं कमबॅक झालं आहे. आता पाऊस सुरु झाल्यानं पेरण्या सुरु होतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. जुलै महिन्याचा पहिला पंधरावडा संपला तरी पेरण्या रखडल्या होत्या.