महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गटासह एनडीएतील ३८ पक्षांच्या नेत्यांचा सहभाग असलेली ही बैठक राजधानी नवी दिल्लीतील अशोक हॉटेलमध्ये पार पडली. त्याचा समारोप करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी आघाडीवर घणाघाती प्रहार केले. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदींना आरसा दाखवला.
“मोदी म्हणजे इंडिया नाही. भाजप म्हणजे इंडिया नाही. आमच्या गठबंधनचं नाव ‘INDIA’ आहे. यात कुणाला आक्षेप घेण्याचं कारण नाही. ‘मोदी इज इंडिया’ हा भारताचा अपमान नाही का? असा सवाल उपस्थित करताना ‘भारतीय जनता पक्ष’ या नावात ‘भारत’ नाही काय?” असा उलट प्रश्न संजय राऊत यांनी आक्षेप घेणाऱ्यांना विचारला.
मोदींच्या बाजूला ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा उभा होता
“मोदींच्या आजूबाजूला भ्रष्टाचाऱ्यांचं संघटन होतं. त्यांच्या बाजूला ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा उभा होता. त्यांच्या पाठीमागे ‘इक्बाल मिर्ची’ उभा होता. यांना बाजूला उभा करुन आमच्यावर कसले भ्रष्टाचाराचे आरोप करता? तुम्ही ही असली ढोंगं बंद करा, लोकांना तुमचं हे ढोंग कळतंय…. त्यामुळे INDIA चा विजय होईल आणि भाजपचा पराभव होईल. हा इंडिया तुमच्या हुकूमशाहीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. हिम्मत असेल तर एनडीएने भारताचा पराभव करुन दाखवावा”, असं आव्हानही संजय राऊत यांनी दिलं.
तुमच्या ‘एनडीए’मध्ये जेलमध्ये जाताजाता खेचलेले लोक
“तुमच्या एनडीएमध्ये जेलमध्ये जाताजाता खेचलेले लोक आहेत. तुम्ही त्यांना खेचून पक्षात प्रवेश दिलाय, अमित शाह देखील जेलमध्ये जाऊन आले. अजित पवार जेलमध्ये जायला निघाले होते, हसन मुश्रीफही जेलमध्ये जायला निघाले होते, हे सगळे कलाकार जेलमध्ये जायलाच निघाले होते… ” अशी टोलेबाजी संजय राऊत यांनी केली.
इंडियाची पुढची बैठक मुंबईमध्ये
“एनडीए ही घोटाळेबाजांची पार्टी आहे. आपण काल पाहिलं असेल की घोटाळेबाज आणि जुमलेबाज सगळे जण सोबत होते. इंडिया एकत्र आल्यानंतर त्यांना एनडीएची आठवण झाली. कारण त्यांना आता इंडियाची भीती वाटते आहे. आता इंडियाची पुढची बैठक मुंबईमध्ये असेल, लवकरच त्याची तारीख जाहीर करु”, असंही राऊतांनी स्पष्ट केलं.