उत्तर कोकणात आज सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोकणातील महाड व खेड ही दोन्ही शहर पुराच्या भीतीच्या छायेत आहेत. सावित्री नदी इशारा पातळीच्या जवळ असल्याने महाड प्रशासन अलर्ट मोडवर आहे. महाड व पोलादपूरच्या वेळी बाजूला असलेल्या सह्याद्री खोऱ्यात महाबळेश्वर येथेही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे महाड शहरात नदीचे पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आजची रात्र महाडवासियांच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या काही तासांमध्ये नदीचे पाणी शहरात शिरण्याची शक्यता आहे.
महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक बंद
कोकणात व सह्याद्रीच्या घाटात महाबळेश्वर येथे जोरदार पाऊस सुरू असल्याने आंबेनळी घाटात पुन्हा एकदा दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे. मंगळवारी रात्री उशिरा या घाटात दरड कोसळली आहे. पर्यटनच्या दृष्टीने हा घाट अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या घाटात यंदा पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेकदा दरड कोसळण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत हा घाट अलीकडेच वाहतुकीसाठी पूर्णपणे बंदही ठेवण्यात आला होता. त्यानंतर रायगड जिल्हा प्रशासनाकडून नियंत्रित पद्धतीने हलक्या प्रवासी वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा मोठी दरड कोसळल्याने घाटाच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे. हा घाट पावसाळ्यात वाहतुकीसाठी पूर्णपणे तीन महिने बंद ठेवावा अशा स्वरूपाचा प्रस्ताव महाड प्रशासनाकडून रायगड जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आला आहे मात्र जिल्हा प्रशासनाकडून आंबेनळी घाटाबाबत कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. आता या सगळ्या घटनाक्रमानंतर रायगड जिल्हा प्रशासन नेमका कोणता निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Maharashtra Weather Update: राज्यात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई-पुण्यासह अनेक भागांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.