ठाण्यातील उपवन तलाव येथे आपल्या ४ ते ५ मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या आदित्य लक्ष्मण पवार हा १७ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी १७ जुलै रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. आदित्य पवार हा ठाण्यातील लोकमान्य नगर पाडा नंबर ४ येथील रहिवाशी तो सावरकर नगर येथील आर. जे. ठाकूर कॉलेजमध्ये बारावीत शिकत होता. आपल्या मित्रांसोबत उपवन तलाव पालायदेवी मंदिर समोरील गणेश घाटावर पोहण्यासाठी गेला असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झाली. या घटनेची माहिती मिळताच वर्तकनगर पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, तलाठी माजीवाडा (महाराष्ट्र शासन-महसूल विभाग), आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत तरण तलाव येथील ४ जलतरणपटू आणि दोन बोटींच्या साहाय्याने बेपत्ता आदित्यची शोध मोहीम सुरु केली. तब्बल ३ तास अथक प्रयत्न केल्यानंतर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आदित्यचा मृतदेह मिळवण्यास बचाव दलाला यश प्राप्त झाले आहे.
बुडालेल्या आदित्य पवार या १७ वर्षीय तरुणाचा शोध घेण्यासाठी बचाव दलांकडून युद्ध पातळीवर शोध सुरु होता. मात्र आदित्यचा मृतदेह तलावाच्या तळभागी गेल्याने शर्थीचे प्रयत्न करावे लागले. दरम्यान बचाव दलाने प्रथम दोन लहान बोटींच्या सहाय्याने आदित्यचा शोध घेतला. त्याचबरोबर ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने देखील समांतर शोध सुरु होता. मात्र त्याचा शोध न लागल्याने बचाव दलाने तरण तलाव येथील ४ जलतरणपटू पाण्यात उतरवले आणि युद्ध पातळीवर तपस करून ३ तासाच्या परिश्रमानंतर मयत आदित्यचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यास त्यांना यश प्राप्त झाले. मात्र आदित्य सोबत घडलेल्या या दुर्घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरात एकच शोककळा पसरली आहे.
मयत १७ वर्षीय तरुण आदित्य याचा मृतदेह बचाव दलांनी तलावातून बाहेर काढून वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. वर्तकनगर पोलिसांनी आदित्यचा मृतदेह ताब्यात घेऊन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढे त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरु आहे. आदित्य सोबत घडलेली घटना ही अपघात की घातपात याचा शोध पोलीस तपासानंतर निष्पन्न होणार आहे. प्रथमदर्शनी आदित्य हा मित्रांसोबत मौज मजा करण्यासाठी पाण्यात पोहण्यासाठी उतरल्या दिसत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.