• Mon. Nov 25th, 2024
    शेतकरी संकटात, पण मराठवाड्यातील या जिल्ह्यांत आता विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार!

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने २० लाख हेक्टरवर पेरणी होऊ शकली नाही. जुलैच्या मध्यातही पावसाने दडी मारल्याने कडधान्यांची पेरणी बाद झाली आहे. कापूस, मका, तूर, सोयाबीन पिकांनाही उशीर झाला असल्याने कमी कालावधीचे वाण निवडण्याची सूचना कृषी विभागाने केली आहे. सद्यस्थितीत खरीप हंगाम पूर्णत: संकटात सापडला आहे.

    मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात पावसाच्या मध्यम ते तुरळक सरी सुरू आहेत. विभागात सरासरी ८२.४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८१.८ मिमी, जालना ८०.१, बीड ६९, लातूर ९१.८, धाराशिव ६२.६, नांदेड ११४.५, परभणी ५३.३ आणि हिंगोली जिल्ह्यात ८१.६ मिमी पाऊस झाला आहे. परभणी, बीड आणि धाराशिव जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने पेरण्या ठप्प झाल्या आहेत. विभागाचे खरीपाचे सर्वसाधारण क्षेत्र ४८ लाख ५७ हजार हेक्टर आहे. त्यापैकी २९ लाख चार हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर तब्बल १९ लाख ५२ हजार क्षेत्रावर पेरणी होऊ शकली नाही. खरीपाच्या ४० टक्के पेरण्या झाल्या नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तुरळक पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र, पावसाने उघडीप दिल्याने त्यातील निम्म्या क्षेत्रावरील पेरण्या धोक्यात आल्या आहेत. सिंचनाची सुविधा असलेल्या क्षेत्रात कापूस आणि सोयाबीन पिके तग धरुन आहेत. इतर क्षेत्रावरील पिके कोमेजण्यास सुरुवात झाली आहे. हलक्या जमिनीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाच लाख ५३, जालना जिल्ह्यात तीन लाख ३७ हजार ४७१, बीड जिल्ह्यात चार लाख ७१ हजार ५९७, लातूर तीन लाख ६३ हजार, धाराशिव दोन लाख सहा हजार ३५०, नांदेड चार लाख ६१ हजार, परभणी तीन लाख ३७ हजार आणि हिंगोली जिल्ह्यात दोन लाख २६ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन लाख ९१ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. मका पिकाची एक लाख ४४ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.

    विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून, पहिल्याच दिवशी होणार हायहोल्टेज राजकीय घडामोडी!

    दरम्यान, मूग आणि उडीद पिके बाद झाली आहेत. कापूस, तूर, मका, सोयाबीन या पिकांच्या कमी कालावधीच्या बियाण्यांची आणखी पंधरा दिवसांपर्यंत लागवड शक्य आहे. शेतकऱ्यांनी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने लागवड करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

    कटोरा घेऊन दारी आला तर, सडकी टोमॅटो द्या त्याला; सदाभाऊंची सुनील शेट्टीवर जहरी टीका

    पावसाची शक्यता

    छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात १८ जुलै रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. १९ जुलै रोजी जालना, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणि २० जुलै रोजी नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाने व्यक्त केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed