वडिलांनी रिक्षा चालवून संसार सावरला
दिपाली सूर्यवंशी यांचे भुसावळ येथील माहेर…त्यांचे वडील निंबा सूर्यवंशी हे रिक्षाचालक आहेत. गेल्या ३० ते ३५ वर्षापासून निंबा सूर्यवंशी हे रिक्षातून प्रवासी वाहतूक करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत आहेत. निंबा पाटील यांना पाच मुली मात्र त्यांनी मुलींच्या शिक्षणाात कुठलीच कसर सोडली नाही. सर्वांना उच्चशिक्षण देत त्यांनी त्यांचं लग्न करुन दिलं. पाच बहिणींमध्ये दिपाली ही सर्वांत लहान होती. बेताच्या परिस्थितीतच दिपाली यांनी समाजशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. लहानपणपासून वडिलांच कष्ट डोळ्यांनी बघितल्याने दिपाली यांनी शासकीय नोकरीचं स्वप्न बघितलं होतं. स्वप्नाच्या दृष्टीने वाटचाल सुरु करण्यापूर्वीच याचदरम्यानच्या काळात २००८ मध्ये दिपाली यांच लग्न झालं.
दिपाली सासरहून माहेरला आल्या
शिरपूर तालुक्यातील अर्थ हे गाव दिपाली यांच सासरं. समाधान सोमा पाटील हे दिपाली यांचे पती, समाधान पाटील हे शेती करतात. दिपाली यांचा संसार सुरु झाला, त्यांना एक मुलगाही झाला. मात्र त्यांना त्यांच स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हतं. त्यांनी याबाबत पती आणि सासरच्यांसोबत चर्चा केली, आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याबाबतचा निर्णय घेतला. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास त्यातच शिक्षणाात पडलेला खंड यामुळे स्पर्धा परिक्षेचे क्लास लावावे लागतील, असा निर्णय दिपालीने घेतला, अभ्यासात कुठेही कमी पडू नये म्हणून दिपाली हिने माहेरी जावून तयारी आणि अभ्यास करण्याच ठरविलं. २०१६ मध्ये दिपाली मुलाला सोबत घेवून भुसावळ याठिकाणी माहेरी आली.
एकाच वेळी डबल धमाका, दोन पदांना गवसणी
दिपाली यांनी त्यांच्या मुलाला याच ठिकाणी शाळेत टाकलं, त्याची जबाबदारी दिपालीच्या आईने सांभाळली. त्यांनी दिपस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात क्लास लावला, याठिकाणच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरु केली. दिपाली सांगतात की त्यांनी तयारी करतांना अस कुठलं पदासाठी अभ्यास करायचं ठरवलं नव्हतं. फक्त शासकीय नोकरी मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. अखेर तिच्या मेहनतीला २०२१ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तिला यश आलं. या परीक्षेचा नुकताच जाहीर झाला असून यात तिची पोलीस उपनिरिक्षकपदी निवड झाली. विशेष याचकाळात क्लर्क पदासाठी दिलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा सुध्दा दिपाली उत्तीर्ण झालीय, एकाचवेळी दोन नोकऱ्यांचा असा अनोखा योगायोग दिपालीच्या आयुष्यात आला. यात तिने पोलीस उपनिरिक्षक पदाची निवड करत अंगावर वर्दी चढविण्याच ठरवलं आहे.
आईला आनंदअश्रू अनावर
रिक्षास्टॉपवर सहकारी मला रिक्षावाल्याऐवजी पोलीस अधिकारी मुलीचे वडील म्हणून म्हणून हाक मारतात, छाती गर्वाने फुलते आणि मुलीचा मोठा अभिमान वाटतो असंही निंबा सूर्यवंशी यांनी सांगितलं. निंबा पाटील यांनी रिक्षाचालक म्हणून शून्यातून विश्व निर्माण केलं, या कष्टांच दिपालीने चीज केलं, तिने जेवण भूक तहान विरुन दिवसरात्र अभ्यास अन् मेहनत घेतली, तिच्या धैर्याला आणि संघर्षाला सुध्दा यश आल्याचं दिपाली यांची आई सांगते. अक्षरशा मैदानी सराव करतांना पाय सुजले असतांनाही, दिपाली थांबली नाही हे सांगतांना दिपालीच्या आईला अश्रू अनावर होतात
वडिलांना लेकीच्या यशाचा अभिमान
लग्नानंतरही मुलगी माहेर राहत असल्याने नातेवाईकांसह अनेकांचे वेगवेगळे प्रश्न असायचे, दिपाली याच्या वडिलांना या प्रश्नांचा सामना करावा लागायचा. दिपालीचे वडील त्यांना योग्य ते उत्तर द्यायचे. मात्र दिपाली हिने अधिकारी होवून सर्वांच्या प्रश्नांना योग्य ते उत्तर दिलं आहे. मुलगा मुलगी असा भेद केला नाही, मात्र मुलीने मुलाप्रमाणेच सर्व कुटुंबात आमचं नाव रोशन केलं. माझ्या कष्टाच सार्थक झालं, आमच्या कुटुंबात दिपाली ही पहिलीची अधिकारी झाली आहे, मुलीच्या यशाने खानदानात आमची मान उंचावली आहे, त्याचा मोठा आनंद असल्याचं दिपाली यांचे वडील निंबा सूर्यवंशी हे सांगतात.
यशाचं श्रेय आई वडिलांना आणि सासरच्यांना
आई वडीलांचे कष्ट आणि पती आणि सासरच्या पाठबळामुळेच मी आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश संपादन करु शकले, असं दिपाली सांगते. दिपालीच्या यशाचा मोठा आनंद तिच्या पतीसह सासरी आहे, या यशाबद्दल तिची सासरच्यांनी सासरी संपूर्ण गावात वाजत गाजत भव्य मिरवणूक सुध्दा काढली. आई वडीलांचे कष्ट होते, त्यांनी माझ्यासाठी खूप त्रास सहन केला, रात्री अपरात्री वडील रिक्षाची प्रवासी वाहतूक करायचे, त्यामुळे खऱ्या अर्थाने माझी जिद्द वाढली, ते कष्ट बघून मी खचले नाही, आणि माझी हिंमत वाढली, आज त्यांचे स्वप्न पूर्ण करु शकले, अधिकारी होवू शकले, या यशामुळे आई वडीलांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे, त्याचे मोठे समाधान आहे, असं दिपाली सूर्यवंशी सांगतात.