• Mon. Nov 25th, 2024

    थोर विभूतींच्या जिल्हा परिषद शाळांचे रुपडे पालटणार; कोकणातील ‘या’ मराठी शाळेचाही समावेश

    थोर विभूतींच्या जिल्हा परिषद शाळांचे रुपडे पालटणार; कोकणातील ‘या’ मराठी शाळेचाही समावेश

    चिपळूण : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ऐतिहासिक गावांतील शाळा विकसित करणार असल्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने केली होती. त्यासाठी राज्यातील १३ शाळांची निवड करण्यात आली असून यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील दोन शाळांचा समावेश आहे. त्यानुसार, सानेगुरूजींची पालगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या मुरूड गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला निधी मंजूर झाला आहे.

    देश उभारणीत ज्या-ज्या महापुरुषांनी बहुमोल योगदान दिले, त्यांच्या जन्मगावातील शाळांचा विकास करण्याची योजना शालेय शिक्षण विभागाने आखली आहे. पहिल्या टप्प्यात दहा महापुरुषांच्या जन्मगावांचा प्रस्ताव तयार केला होता. अर्थसंकल्पीय भाषणात अर्थ मंत्रालयाकडून महापुरुषांशी संबंधित ऐतिहासिक गावांतील शाळा विकसित करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाला निधी मंजूर झाला आहे. तसा शासन निर्णय ७ जुलै २०२३ रोजी काढण्यात आला आहे. राज्यातील १३ शाळांसाठी १४ कोटी ३० लाख २० हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पालगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या मुरूड गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा समावेश आहे.

    मुरुड शाळेसाठी ३७ लाख ३५ हजार ११५ रुपये, तर सानेगुरुजींच्या पालगड येथील शाळेसाठी ३ कोटी ३८ लाख ३२ हजार २७६ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीमधून महापुरुषांच्या जन्मगावातील शाळा आधुनिक केल्या जाणार आहेत. तेथे सुसज्ज इमारती बांधल्या जाणार आहेत. या महापुरुषांचा इतिहास आणि विचार सांगणारे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या सर्व शाळा ऐतिहासिक असल्याने नव्या पिढीसमोर आपापल्या गावातील महापुरुषांचा आदर्श उभा राहून राष्ट्राच्या उभारणीत योगदान देणारे प्रोत्साहन मिळावे, असा या उपक्रमाचा उद्देश ठेवण्यात आला आहे. मुरुड येथे ज्या शाळेत भारतरत्न महर्षी कर्वे शिकले ती शाळा आजही उत्तम स्थितीत आहे. त्यामुळे ही जिल्हा परिषदेची शाळा हेरिटेज वास्तू म्हणून जतन करावी, अशी प्रतिक्रिया निवृत्त शिक्षक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनायक बाळ यांनी दिली.

    जिल्ह्यातील दहा शाळांचे प्रस्ताव

    ऐतिहासिक पाश्र्वभूमी असलेल्या गावांतील जिल्हा परिषद शाळांचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सहा तालुक्यांतील दहा शाळांची यादी शासनाला सादर करण्यात आली होती. त्यात आंबवडे शाळा (मंडणगड), मुरुड, पालगड (दापोली), मालण क्र. १, आवरे, असोरे (गुहागर), कवी केशवसुत प्राथमिक शाळा (रत्नागिरी), कोट क्र. १, कोलधे क्र. १ (लांजा), आदर्श शाळा पिरंदवणे क्र. १ (राजापूर) या शाळांचा समावेश आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *