• Mon. Nov 25th, 2024

    बंडखोर मंत्र्यांनी पवारांकडे काय विनंती केली? बैठकीत काय घडलं? जयंत पाटलांनी सविस्तर सांगितलं!

    बंडखोर मंत्र्यांनी पवारांकडे काय विनंती केली? बैठकीत काय घडलं? जयंत पाटलांनी सविस्तर सांगितलं!

    मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध बंड करत राज्य सरकारमध्ये सामील झालेल्या मंत्र्यांनी आज अचानक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवारांची भेट घेतली. यावेळी बंडखोर गटाचं नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकर, तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे उपस्थित होते. या भेटीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून फुटीर गटाने घडलेल्या संपूर्ण प्रकाराबाबत शरद पवारांकडे दिलगिरी आणि खंत व्यक्त केल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.

    ‘पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या बैठकीला मी उपस्थित होतो. त्यावेळी मला अचानक खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आला. आपण तात्काळ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे यावं, अशी शरद पवारसाहेबांची सूचना असल्याचं मला सुप्रियाताईंनी सांगितलं. त्यानंतर मी इथे आलो. राष्ट्रवादी पक्षापासून वेगळी भूमिका घेऊन सरकारसोबत गेलेल्या नेत्यांनी शरद पवारांकडे या बैठकीत दिलगिरी व्यक्त केली. तसंच या सगळ्यातून पक्ष एकसंध राहावा, यासाठी मार्ग काढण्याची विनंती केलेली आहे. मात्र पवारसाहेबांनी या विनंतीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही,’ अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

    साहेब आमचा सरकारला पाठिंबा, आपणही आमच्यासोबत चला, दादांच्या मंत्र्यांना पवारांचं इशाऱ्यांनी उत्तर

    ‘आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम’

    राष्ट्रवादीतील बंडखोर नेते शरद पवार यांना भेटल्याने आता संपूर्ण राष्ट्रवादी पक्षच सत्तेत सहभागी होणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे. याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ‘आम्ही याआधीच सरकारसोबत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही त्या निर्णयावर सध्या ठाम आहोत. बंडखोर नेत्यांनी केलेल्या विनंतीवर काय उत्तर द्यायचं, हा आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा प्रश्न आहे,’ अशा शब्दात पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

    दरम्यान, राष्ट्रवादीचे १९ ते २० आमदार आमच्यासोबत असल्याचा दावाही जयंत पाटलांनी केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *