• Sat. Sep 21st, 2024

VIDEO: रस्त्यात लघुशंका करताना हटकल्याचा राग, बार मॅनेजरला कारच्या बोनेटवर बसवलं आणि…

VIDEO: रस्त्यात लघुशंका करताना हटकल्याचा राग, बार मॅनेजरला कारच्या बोनेटवर बसवलं आणि…

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : बारसमोर लघुशंका करण्यास हटकल्याने एका चौकडीने बारच्या व्यवस्थापकावर कार घालून, त्याला कारच्या बोनेटवरून एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची घटना मंगळवारी रात्री तुर्भे सेक्टर-२२मध्ये घडली. यानंतर फरार झालेल्या चौकडीविरोधात एपीएमसी पोलिसांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून माहिती मिळवून एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणातील इतर तीन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीचे नाव विकास वसंत गुरव (२८) असून फरार झालेल्यांमध्ये आशीष जाधव, हेमंत शेवाळे व एका अज्ञात तरुणाचा समावेश आहे. गेल्या मंगळवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास हे चौघे अर्टिगा कारने तुर्भे सेक्टर-२२मध्ये गेले होते. त्यांनी तेथील एका बारमधून मद्य व खाद्यपदार्थ विकत घेतले. त्यानंतर विकास गुरव हा बारबाहेर पानटपरीजवळ लघुशंका करण्यासाठी थांबला. टपरीचालकाने हटकले असता, विकासने भांडण सुरू केले. हे पाहून बारचा व्यवस्थापक ऋतुराज शेट्टी त्यांना समजावण्यासाठी गेला असता, तिघांनी त्याला शिवीगाळ, मारहाण करण्यास सुरुवात केली.

Jalna Murder : वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याची काकाकडून निर्घृण हत्या; घटनेनं जिल्ह्यात खळबळ

त्यानंतर कारमध्ये जाऊन बसलेल्या हेमंत शेवाळे याने ऋतुराजच्या अंगावर गाडी घातली. जीव वाचवण्यासाठी ऋतुराजने कारच्या बोनेटला पकडले असता, कारचालकाने त्याला त्याच अवस्थेत एक किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. कारचा वेग कमी झाल्यानंतर ऋतुराजने रस्त्याच्या बाजूला उडी मारून स्वत:ची सुटका करून घेतली. त्यानंतर आरोपी कार घेऊन फरार झाले. यात ऋतुराज याला मोठ्या प्रमाणात मुका मार लागला आहे.

ऋतुराज याने एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी आरोपी चौकडीविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आणि परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून चारही आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर विकास गुरव याला अटक केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed