• Sun. Sep 22nd, 2024

दिव्यांग बालकांना सांगली जिल्ह्यातील मिरज येथील शासकीय निवासी संस्थेमध्ये मोफत प्रवेश

ByMH LIVE NEWS

Jul 13, 2023
दिव्यांग बालकांना सांगली जिल्ह्यातील मिरज येथील शासकीय निवासी संस्थेमध्ये मोफत प्रवेश

मुंबई, दि. 13 : दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे अंतर्गत सांगली जिल्ह्यातील मिरज येथील शासकीय निवासी संस्थेत दिव्यांग (अस्थिव्यंग) बालकांना सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु असून मोफत प्रवेशासाठी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

मोफत शिक्षण सुविधेमध्ये संस्थेच्या परिसरात पहिली ते चौथीपर्यंतचे मोफत प्राथमिक शिक्षण, इयत्ता 5 वी पासून पुढील शिक्षण माध्यमिक शाळेमार्फत, माध्यमिक शाळेत जाण्यायेण्याकरिता मोफत वाहतुकीची सुविधा, पाठ्यपुस्तके वह्या, इतर शैक्षणिक साहित्य व शालेय गणवेश मोफत देण्यात येणार आहे. मुलींसाठी विशेष काळजी घेण्यासाठी महिला काळजीवाहक आहेत.

वसतिगृह सुविधेमध्ये दिव्यांग मुला- मुलींची स्वतंत्र निवास व्यवस्था व मोफत जेवण, प्रत्येक विद्यार्थ्यांस कॉट, गादी, बिछाना व इतर साहित्याचा मोफत पुरवठा, दररोज आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय, शुद्ध व थंडगार पाण्याची सुविधा पुरविण्यात येणार आहे.

शस्त्रक्रिया भौतिकोपचार सुविधेमध्ये अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गरजेनुसार शस्त्रक्रिया व भौतिकोपचाराची सुविधा, गरजेनुसार कृत्रिम अवयव, कुबड्या, तीन चाकी सायकल वाटप,वयोगट शून्य ते सहाकरिता मोफत भौतिकोपचार करण्यात येतील.

प्रवेशाबाबतच्या अटींनुसार प्रवेशित अस्थिव्यंग असला पाहिजे, वयोगट 6 ते 17 वर्षे, प्रवेश अर्जासोबत सिव्हील सर्जन यांनी दिलेल्या दिव्यांगाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, तीन फोटो आवश्यक आहेत. प्रवेश अर्ज व माहितीपत्रक पत्त्यावर समक्ष अथवा पोस्टाव्दारे मोफत मिळतील. अधिक माहितीसाठी अधिक्षक, शासकीय दिव्यांग बालगृह व शाळा, किल्ला भाग, बीएसएनएल ऑफिस शेजारी मिरज – 416410 जि. सांगली या पत्त्यावर संपर्क साधावा. तसेच भ्रमणध्वनी क्रमांक 9325555981, 9552234586, 9422216459 यावर संपर्क साधता येणार आहेत.

****

शैलजा पाटील/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed