• Sat. Sep 21st, 2024
अमेरिकेत होते, तिथूनच प्लॅन केला, भारतात येताच पवारांना बाय बाय करुन अजितदादांच्या गटात!

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली त्यावेळी परदेशात असलेले कोपरगावचे युवा आमदार आशुतोष काळे नुकतेच देशात परतले आहेत. परत येताच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा व्यक्त केला. इकडे राजकीय घडामोडी सुरू असताना काळे कुटुंबासह परदेशात गेले होते. तेथून त्यांनी सुरवातीला शरद पवार यांच्यासोबत असल्याचे संकेत दिले होते. मात्र, नंतर अजितदादांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आल्या आल्या ते अजितदादांच्या भेटीला गेले. पहिल्यांदाच निवडून आलेल्या काळे यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद देण्यात आले होते. अजितदादांना पाठिंबा देताना पवार आमचे दैवत आहेत, हे सांगायला ते विसरले नाहीत.

अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सहापैकी चार आमदारांनी उघडपणे आणि अधिकृतपणे अजित पवार यांना पाठिंबा दिलाय. राहुरीचे प्राजक्त तनपुरे आणि कर्जत-जामखेडचे रोहित पवार हे दोनच आमदार शरद पवार यांच्यासोबत राहिले आहेत. नगरचे संग्राम जगताप, पारनेरचे नीलेश लंके यांची भूमिका सुरवातीलाच स्पष्ट झाली. तर अजितदादांकडे जाऊन परत पवारांकडे आलेले अकोल्याचे डॉ. किरण लहामटे अखेर पुन्हा अजितदादांसोबत गेले.

कारखान्याची ढाल पुढे करुन कार्यकर्त्यांना हाताशी धरलं, मकरंद आबांनी करेक्ट कार्यक्रम करत अजितदादांना गाठलं!
मात्र, परदेशात असलेल्या काळेंची प्रत्यक्ष भूमिका स्पष्ट होत नव्हती. काळे प्रथमच निवडून आले. त्यांच्यावर पवार यांनी शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदाची महत्वाची जबाबदारी सोपविली होती. मात्र, सततच्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे त्यांना तेथे व्यवस्थित काम करता आले नाही. शेवटी न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांचे हे पदही गेले. राज्यात अनेक मोठे नेते असताना त्यावेळी पवार यांनी काळे यांच्यावर ही जबाबदारी सोपविली होती.

स्व. शंकरराव कोल्हे यांच्या सुनबाई स्नेहलता यांनी भाजपमध्ये प्रवेश करून मागीलवेळी आमदारकी मिळविली होती. एकेकाळी पवारांचे विश्वासू असलेल्या कोल्हे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आणि काँग्रेसमधून काळे राष्ट्रवादीत आल्याने पवारांनी काळे यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला होता.

विखेंच्या लेकाची धडाकेबाज कामगिरी, पहिल्याच टर्ममध्ये बाजी, देशपातळीवर कामाचा गवगवा
आज दुपारी काळे यांनी अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. यासंबंधी आमदार काळे यांनी म्हटले आहे, “कोपरगाव मतदारसंघाच्या विकासाचे स्वप्न डोळ्यासमोर ठेऊन आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन पाठिंबा दिला. शरद पवारसाहेब आमचे दैवत आहेत. त्यांचे आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी आहेत, याचा मला विश्वास आहे. मी घेतलेल्या या निर्णयाला सर्व कार्यकर्त्यांचा व कोपरगाव मतदारसंघातील मतदारांचा पूर्ण पाठिंबा राहील याची मला खात्री आहे”, असेही काळे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यात आता अजित पवार यांची बाजू किमान आमदारांच्या बाबतीत तरी मजबूत झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed