‘रेड झोन’मध्ये १९ जिल्हे असून, विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, वाशीम, अमरावती व बुलढाणा जिल्ह्यांचा यात समावेश आहे. मृग नक्षत्रात बेपत्ता असलेला पाऊस आर्द्राच्या आगमनाला बरसला. या बळावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. नंतर हा पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली. वर्धा जिल्ह्यात दुबार पेरण्या करण्यात आल्या. स्थिती बिकट होऊ लागली असतानाच दोन दिवसांपासून पाऊस परतला आहे.
अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यात सोमवारी पहाटेपासून पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत सरासरी १०८ मिमी पाऊस झाला आहे. वर्धा आणि चंद्रपूर जिल्हा पावसाच्या आगमनाने सुखावला आहे.अमरावती विभागात ६० टक्के पेरण्याया पावसामुळे अमरावती विभागात ६० टक्क्यांहून अधिक पेरण्या झाल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. अमरावती जिल्ह्यात ७१.०५ टक्के, यवतमाळात ८६.१ टक्के, बुलढाणा ४३.४, अकोला ४९.८ टक्के तर वाशीम जिल्ह्यात ७७.८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सर्व्हर डाउन असल्याने राज्यातील पावसाची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. दोन दिवसांत हे सर्व्हर दुरुस्त केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुरात अडकलेल्या पुजाऱ्यांसह भाविकांची सुटका
भंडारा : माडगी परिसरातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या मधोमध असलेल्या नृसिंह मंदिरात पुरामुळे अडकलेल्या भाविकांना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता सुखरूप बाहेर काढण्यात आले. भंडारा जिल्ह्यात वैनगंगेच्या खोऱ्यात पावसाची संततधार सुरू असल्याने नदीचा जलस्तर वाढला आहे. आपत्ती व्यवस्थापनाने आधीच नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. यातच मंगळवारी सकाळी काही भाविक मोहाडी तालुक्यातील माडगीच्या नृसिंह मंदिरात पूजेसाठी गेले होते. काहीच वेळात नदीचा जलस्तर वाढल्याने पूजाऱ्यांसह भाविक अडकले. जिल्हा नियंत्रण कक्षाला याविषयीची माहिती होताच बोटीच्या साह्याने त्यांना बाहेर काढण्यात आले. मागील वर्षीही भाविक याच पद्धतीने अडकले होते.
नाल्याच्या पुरात महिला वाहून गेली
यवतमाळ : नातेवाइकांना भेटून गावाकडे परत निघालेली महिला नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना सोमवारी सायंकाळी बाभूळगाव तालुक्यातील पंचगव्हाण येथे घडली. नानीबाई भीमराव देवतळे (५२, रा. चोंढी) असे मृत महिलेचे नाव आहे. नानीबाई या पंचगव्हाण चोंढी येथील नातेवाइकांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्या सायंकाळी गावाकडे परतत असताना दोन गावांच्या मध्ये असलेल्या नाल्यावरून पाणी वाहत होते. घरी लवकर जाण्यासाठी त्या पुलावरून निघाल्या असता वाहून गेल्या. गावकऱ्यांनी शोध घेतला; मात्र अंधार वाढल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. मंगळवारी सकाळी नानीबाई यांच्या मृतदेह पंचगव्हाणपासून दोन किमी दूर अंतरावर आढळला.
विभागनिहाय जलसाठा
कोकण : ५०.९५%
मराठवाडा : २४.५३ %
नागपूर : ४६.५०%
अमरावती : ३८.४५%
नाशिक : २९.२३ %
पुणे : २०.०२%
राज्यात ३६४ गावे व ९५५ वाड्या तहानलेल्या
राज्यात ३६४ गावे व ९५५ वाड्यांमध्ये पाणीटंचाई असल्याने ३२६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नागपूर आणि कोकण विभाग वगळता इतरत्र हे टँकर धावत आहेत. मागील वर्षी याच कालावधीत राज्यात २१९ गावे व ४०० वाड्यांत १९२ टँकर धावर होते. अमरावती विभागातील ३३ गावांत ३४ टँकर, औरंगाबादमध्ये ५७ गावे व चार वाड्यांत ४९ टँकर, पुण्यामध्ये १२० गावे व ६४२ वाड्यांत १०६ टँकर, नाशिक विभागात १५४ गावे व ३०९ वाड्यांत १३७ टँकर सुरू आहेत.