कोल्हापूर महापालिकेत माजी आमदार महादेवराव महाडिक यांची वीस वर्षापेक्षा अधिक काळ सत्ता होती. कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता त्यांनी महापालिकेवर वर्चस्व ठेवले. निवडणुकीत एका प्रभागातील दोन-तीन ताकदीच्या उमेदवारांना मदत करायची, मग तो कोणत्या गटाचा असो, पक्षाचा असो वा स्वतंत्र. त्यातून निवडून येईल तो आपला. हा होता महाडिक पॅटर्न. अनेक वर्षे या पद्धतीने वर्चस्व ठेवताना नंतर त्यांनी ताराराणी आघाडीची स्थापना केली. या आघाडीतही काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेचे नगरसेवक असायचे. या सर्वांनाच पदे दिली जायची. यामध्ये अपक्ष नगरसेवकांची संख्या मोठी असे. येथे सूत्र एकच होते, झेंडा कोणताही असो, निवडून आलेला नगरसेवक आपला.
सन २००५ साली प्रथमच काँग्रेसच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर महापालिकेची निवडणूक लढविण्यात आली. राष्ट्रवादी, जनसुराज्य, भाजप व शिवसेना असे पक्ष स्वतंत्र लढले आणि प्रथमच महापालिकेत पक्षीय राजकारण सुरू झाले. पण तत्पूर्वी तब्बल वीस ते पंचवीस वर्षे महाडिक पॅटर्न नुसारच महापालिकेत कारभारी निवडले जायचे. ‘निवडून आलेला तो आमचा’ असा तो पॅटर्न. पक्षीय राजकारण सुरू झाल्यापासून तो बंद होऊन आघाड्यांचा नवा पॅटर्न सुरू झाला.
राज्याच्या राजकारणातही आता असाच पॅटर्न येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा पहिला प्रयोग या पक्षाने गोवा राज्यात केला. मध्य प्रदेशातही तो यशस्वी झाला. महाराष्ट्रात शिंदे गट आणि अजित पवार गटांना सोबत घेत याच प्रयोगाची उजळणी केली.
या सर्व पार्श्वभूमीवर बदलत्या राजकीय समीकरणाने यापुढे भाजप महाडिक पॅटर्न राज्यातच नव्हे तर देशातही राबविण्याची शक्यता आहे. तुम्ही कोणत्याही पक्षाच्या झेंड्याखाली निवडून या, विजयी झाल्यानंतर आमच्या सोबत या अशाच पद्धतीने सोयीचे राजकारण हा पक्ष करण्याच्या तयारीत आहे. येत्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, केंद्रिय मंत्री रामदास आठवले, जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे यांच्यासह मनसे, सुराज्य असे अनेक पक्ष, नेते भाजपसोबत येण्याची चिन्हे आहेत. या सर्वांना जागा वाटप करत बसण्यापेक्षा तुम्ही निवडून या, नंतर आमच्या सोबत येऊन कमळाला ताकद द्या हाच फार्म्युला वापरण्यात येणार असल्याचे समजते. त्या दृष्टीनेच हालचाली सुरू झाल्या आहेत.
शिंदे, पवार, कोरे, राज ठाकरे यांना सोबत घेऊन लढताना जागा वाटप करताना भाजपची मोठी दमछाक होणार आहे. असे झाल्यास भाजपला लढण्यासाठी अतिशय कमी जागा मिळतील. यामुळे पक्षात नाराजी वाढेल. यातून मार्ग काढण्यासाठी प्रथम महापालिका आणि नंतर विधानसभा निवडणुकीत महाडिक पॅटर्न राबविण्याबाबत पक्षात विचार सुरू झाला आहे.