राष्ट्रवादीच्या अजित दादांसह एकूण नऊ जणांना मंत्रिपदाची शपथ दिल्याने शिवसेनेच्या शिंदे यांच्या आमदारांमध्ये काहीशी अस्वस्थता होती रायगड मधील सहा आमदारांनी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन थेट विरोध केला होता. रायगडचे पालकमंत्री पद आदिती तटकरे यांना देण्यात येऊ नये अशी उघडपणे मागणी त्यांनी केली होती. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या विस्तारात भरत गोगावले यांचे नाव निश्चित झाले आहे. गोगावले यांना मंत्रिमंडळ स्थान मिळाल्यास कोकणात उदय सामंत,आदिती तटकरे व दीपक केसरकर अशी एकूण चार मंत्रीपदे कोकणच्या वाट्याला येतील हे स्पष्ट आहे.
ठाणे जिल्ह्यातून डॉ बालाजी किणीकर, मराठवाड्यातून संजय शिरसाट आणि कोकणातून भरत गोगावले यांचा समावेश होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. शिवसेना भाजप युतीबरोबर उपमुख्यमंत्री अजित दादा यांची राष्ट्रवादी येणार असल्यानेच हा मंत्रिमंडळ विस्तार लांबला होता अशीही स्पष्ट कबुली गोगवले यांनीच चार दिवसांपूर्वी दिली होती इतकेच नव्हे तर हे घडणारच होते याची आम्हाला माहिती देण्यात आली होती असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत गेल्या आठवड्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री अजितदादांच्या राष्ट्रवादीला कोणते खाते द्यावे तसेच कोणत्या अकार्यक्षम मंत्र्यांना वगळले जावे या विषयावर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
गेल्या आठवड्यातच मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाल्याच वृत्त आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला कोणते खाते देण्यात यावे, मंत्रिमंडळ विस्तारात कुठल्या अकार्यक्षम मंत्र्यांना वगळण्यात यावे याबाबत चर्चा झाल्याचे समजते.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे अर्थ खाते देण्यास शिवसेना व भाजप या दोघांचाही विरोध आहे. त्यामुळे त्यांच्याकडे विखे पाटलांचे महसूल खाते देण्यात येईल अशी सूत्रांची माहिती आहे. शिंदे गटाचे अकार्यक्षम म्हणून शिक्का असलेले मंत्री अब्दुल सत्तार, डॉ तानाजी सावंत आणि संदीपान भुमरे यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या जागी अंबरनाथचे आमदार डॉ बालाजी किणीकर, औरंगाबाद पश्चिम विधानसभेचे आमदार संजय शिरसाट आणि महाडचे आमदार भरत गोगावले यांचा समावेश शिंदे गटाकडून केला जाणार असल्याचे समजते.
भाजपाकडूनही अतुल सावे यांनाही वगळले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या साखर कारखान्याच्या निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनलचा काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी भाजपच्या मदतीने पराभव केला यावरून विखे पाटलांचे पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारातही विखे पाटलांना धक्का बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे धुळे दौऱ्यावर असल्याने मंत्रिमंडळ विस्तारा बाबत चर्चा होऊ शकली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांमध्येही चर्चा झाल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब केल जाईल.