• Sat. Sep 21st, 2024

४६ वर्षांनंतर पहिल्यांदाच मंदिर आले पूर्णपणे पाण्याबाहेर, दर्शनासाठी भाविकांची उसळली गर्दी

४६ वर्षांनंतर पहिल्यांदाच मंदिर आले पूर्णपणे पाण्याबाहेर, दर्शनासाठी भाविकांची उसळली गर्दी

बेळगाव: यंदा पाऊस लांबल्याने अनेक धरणं, नद्या , तलावांनी तळ गाठला आहे. यामुळे या ठिकाणी गेली कित्येक वर्षं पाण्याखाली लपलेली गावं, मंदिरं , स्मारकं समोर येत असून हा पर्यटकांसाठी एक प्रकरचा खजिना आहे. हे पाहण्यासाठी पर्यटक ठिकठिकाणी गर्दी करत असून असाच एक ४६ वर्षांपूर्वीचा खजिना धरणातील पाणी कमी झाल्याने समोर आला आहे. हे एक मंदिर असून ते गेल्या ४६ वर्षांपासून पाण्याखाली होतं. इतकच नाही तर मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती स्वरूप वारूळ मातीची असून ती ९५ वर्षापूर्वीची आहे. मंदिर इतक्या वर्षं पाण्यात राहून देखील यातील मातीची मूर्ती स्वरूप वारूळ जशीच्या तशीच आहे.

कुठे आहे हे मंदिर?

पुणे-बंगळुरू महामार्गावर संकेश्वर-बेळगांव दरम्यान बेळगांवपासून ४० तर संकेश्वरपासून २७ किलोमीटर अंतरावर हुन्नूर येथे हे मंदिर आहे. हिडकल धरणाच्या जलाशयात पाण्याखाली हुन्नुरचे हेमाडपंती विठ्ठल मंदिर व गाभाऱ्यातील मातीची मूर्ती तब्बल ४६ वर्षानंतरही सुस्थितीत आहे. मान्सूनचा पाऊस लांबल्यामुळे ५१ टीएमसी क्षमतेच्या धरणातील पाण्याने यावर्षी तळ गाठल्याने तब्बल चार दशकानंतर पहिल्यांदाच हे मंदिर पूर्णत: पाण्याबाहेर आले आहे. त्यामुळे बेळगांव जिल्ह्यासह सीमाभागातील भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे.

Isha Ambani: मुकेश अंबानींचा लाडक्या लेकीवर विश्वास, आणखी एका कंपनीची सोपवली जबाबदारी
काय आहे मंदिराचा इतिहास?

खरं तर बेळगाव जिल्ह्यातील हुन्नूर हे गाव सध्या विस्थापित झालेलं गाव असून १९७७ पूर्वी हे गाव या धरण क्षेत्रात होतं. मात्र धरण बांधायचे असल्याने १९७३ मध्येच गाव विस्थापित करण्यात आले. हे गाव धरण क्षेत्रात असताना म्हणजे १९२८ मध्ये केवळ ८ हजारात येथील शिंगाडी मायाप्पा पुजारी, बाळाप्पा रंगाप्पा गडकरी, गुरूनाथ संभाजी कुलकर्णी यांच्या पुढाकाराने हे मंदिर बांधण्यात आले आहे होते. १९७७ मध्ये जलाशयाचे काम पूर्ण झाले. यामुळे हुन्नूर ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेलं हे मंदिर पाण्याखाली गेलं.

मंदिराबाबत सांगितली जाते आख्यायिका

या मंदिराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. ती म्हणजे निवडुंगाच्या झुडपातील वारूळात विठ्ठलचा वास होता. त्याठिकाणी येताच पाटलाच्या गाईला आपोआप पान्हा फुटायचा. गावातील एका माणसाच्या स्वप्नात येवून देवाने सांगितले की, ‘मी विठ्ठल आहे…माझी पूजा करा’. त्यामुळे गावकऱ्यांनी वारूळाची पूजा करून त्याचठिकाणी मंदिर बांधण्यात आले. ३० बाय ३० आकाराचे हे मंदिर काळ्या पाषाणात स्थानिक कारागीरांनी चुनखडीत बांधले आहे. मंदिराचे खांब, चौकटी, खिडक्या, छत, तसेच सुमारे ४० फूट उंचीचे शिखरही दगडी आहे. जुन्या मंदिराच्या आवारातील घोड्याचा तबेला, शाळा आणि स्वयंपाकाची खोली पाण्यामुळे पडली आहे. परंतु, मंदिराचे भव्य दगडी प्रवेशद्वार अन् सनई, चौघड्याची दुमजली खोली अद्याप शाबूत आहे.

Gold : जगभरातील देशांना त्यांचे सोने परत हवे आहे, जाणून घ्या काय आहे नेमके कारण
जलाशयाच्या काठावरूनच पूजा-अर्चा

हे विठ्ठल मंदिर असले तरी याठिकाणी विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती नाही. वर्षानुवर्षाच्या ‘चंद्र’लेपणामुळे वारूळावर शेंदूरसदृश्य थर तयार झाला आहे. ४६ वर्षे पाण्यात राहूनही हे वारूळ विरघळलेले नाही, त्यावरील घोंगड्याची घडीही मोडलेली नाही. जलाशयातील मंदिराच्या आजूबाजूला श्री बसवाण्णा, श्री. लक्ष्मी, श्री दुर्गामाता यांची छोटी मंदिरे आहेत. यापैकी बसवाण्णा मंदिर अद्याप निम्मे पाण्यातच आहे. गावाचं ग्रामदैवत असल्याने आणि गावात धरण बांधल्यामुळे १९७३ मध्ये विस्थापित झाल्यानंतर शासनाने सिमेंटमध्ये विठ्ठलाचे नवे मंदिर बांधून दिले. परंतु, ते जुन्या मंदिरासारखे दिसत नसल्याने ते पाडून कोट्यवधी रूपये खर्च करून ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून पुन्हा जुन्या मंदिराची प्रतिकृती असणारे भव्य मंदिर पुर्नवसित गावात बांधले आहे.

या गावात जवळपास ३०० कुटुंबं राहतात. यात जवळपास अडीचशे कुटुंबे धनगर समाजाची आहेत. त्यांच्याकडेच या मंदिराची पूजा आहे. उर्वरित लिंगायत, ब्राम्हण, बेडर, मुस्लिम आणि अनुसूचित जातीची कुटुंबे मंदिराची हक्कदार आहेत. रोज जलाशयातील पाणी ओसरून मंदिरात जाण्यास वाट झाली तरच जुन्या मंदिरात अन्यथा जलाशयाच्या काठावरूनच पूजा-अर्चा केली जाते. तर नव्या मंदिरात नित्यनेमाने दैनंदिन पूजा-अर्चा होते. गावकरीच मंदिराचे व्यवस्थापन करतात.

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, भायखळा येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड; पाहा, कशी आहे वाहतुकीची स्थिती
दरवर्षी दसरा आणि गुढीपाडव्याला मंदिरात यात्रा भरते. त्याशिवाय रविवारी आणि अमावस्येला दर्शनासाठी भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. यात्रेला कोल्हापूरच्या वाडी रत्नागिरीतील जोतिबाच्या यात्रेप्रमाणे येथेही सासनकाठ्या नाचवतात. पालखीसाठी पितळेच्या ३ मूर्ती आहेत. त्या ‘ब्रम्हा, विष्णू, महेशाच्या आहेत असे ग्रामस्थ सांगतात. तर भाविक देवाला केवळ केळीचा नैवद्य ठेवतात. कुणी पैसे ठेवल्यास त्यातील फक्त ५ रूपये पुजारी घेतात अन् उर्वरित रक्कम देवस्थानच्या खर्चासाठी वापरतात.

असे हे हेमाडपंती मंदिर तब्बल ४६ वर्षानंतर समोर आल्याने पर्यटक आणि भविकांची मंदिर पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. मात्र आता मान्सून दाखल झाल्याने पाऊस सुरू झाला असून धरण क्षेत्रात पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे मंदिर आता पुन्हा पाण्यात जाऊ लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed