मागाठाणे स्थानकाला लागून असलेल्या भूखंडात मेसर्स डीराइव्ह ट्रेडिंग अॅण्ड एस्कॉर्ट्स लिमिटेडकडून खोदकाम सुरू होते. यावेळी भूखंड व स्थानक यांमधील रस्ता मागील आठवड्यात खचला. तसेच स्थानकाच्या बाजूला असलेल्या पर्जन्यजल वाहिनीची भिंतदेखील कोसळली. यामुळे खोदकामाच्या खड्ड्यातील पाणी जमिनीखालून जिन्यापर्यंत येऊन, जिना कोसळण्याची भीती निर्माण झाल्याचे एमएमएमओसीएल, एमएमआरडीए व महापालिकेने केलेल्या संयुक्त तपासणीत आढळले होते. हे खोदकाम तत्काळ थांबवण्यात आले व रस्त्याचे कामदेखील सुरू करण्यात आले आहे. मात्र जिना नेमका किती सक्षम आहे, याचा तपास आयआयटीकडून होत आहे.
‘रस्ता पूर्ववत करण्याचे काम सुरू झाल्यानंतर व संबंधित खोदकाम थांबवल्यानंतर सध्या तरी हा जीना सुरक्षित असल्याचे संयुक्त पाहणीत निश्चित झाले आहे. मात्र जिन्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्याची गरज होती. त्यासाठी ‘एमएमएमओसीएल’ने हे काम आयआटी मुंबईकडे सोपविले आहे. त्यांच्या तज्ज्ञांकडून सखोल अभ्यास सुरू आहे. यासंबंधीचा अहवाल पुढील आठवड्याच्या सुरुवातीला सादर होईल. त्यामधील शिफारशींनुसार पुढील निर्णय घेतला व स्थानकाच्या उत्तरेकडील जिना सुरू केला जाईल. मेट्रोचे खांब मात्र पूर्णपणे भक्कम व सुरक्षित आहेत’, असे ‘एमएमएमओसीएल’मधील सूत्रांनी सांगितले.
खोदकाम बेकायदा
आयआयटी मुंबईकडून पहिल्या टप्प्यातील पाहणी पूर्ण झाली आहे. त्यानुसार संबंधित बांधकाम व्यावसायिकाने बेकायदा पद्धतीने खोदकाम केल्याचे दिसून आले आहे. कुठल्याही पूर्वपरवानगीशिवाय व खोदकामाआधी आवश्यक असलेला उतार निश्चित न करता उभ्या पद्धतीने तब्बल १३ मीटरपर्यंत खोदकाम करण्यात आले.
संबंधित भूखंडाच्या भूमितीय स्थितीनुसार इतके खोल खोदकाम करताना आवश्यक तो उतार तयार करून, तसेच उतारावर भिंत बांधून त्यानंतर हे खोदकाम करणे आवश्यक होते, असे आयआयटीच्या प्राथमिक तपासात समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.