• Mon. Nov 25th, 2024
    पोहोण्यासाठी गेले पण घरी परत येणं नशिबातच नव्हतं, जीवलग मित्रांचा बुडून मृत्यू

    जालना : जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील केदारवाकडी येथील धरणाच्या पाण्यात बुडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीये. रविवारी दुपारच्या सुमारास दोन्ही मुलं धरणाच्या पाण्यात बुडाल्याने मृत तरुणांच्या गावावर शोककळा पसरली आहे.

    रोहीत दिपक टाक (वय २३ वर्षे ) व नितीन गुणाजी साळवे (२५ वर्षे) अशी या दोघा तरुणांची नावे आहेत. परभणी जिल्ह्यातील सेलू येथील गायत्री नगर भागात राहणाऱ्या रोहित दिपक टाक व नितीन गुणाजी साळवे हे तरुण जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातील केदार वाकडी धरणात पोहण्यासाठी गेले होते. पोहण्यासाठी पाण्यात उतरत असताना धरणात मच्छीमारी करणाऱ्या तरुणांनी त्यांना पाहिले होते.

    कुणी तरबेज असतील म्हणून धरणाच्या पाण्यात उतरले असतील, असे त्यांना वाटले. पण धरणाच्या पाण्यात उतरलेले ते दोघे बुडू लागल्याचा अंदाज मच्छीमार तरुणांना येताच क्षणाचाही विचार न करता धरणावर मच्छीमारी करणाऱ्या शरद लुचारे, निलेश बनगे, भारत कुटारे, मानिक कुटारे, बाळू घिसडे, महादू बिजूले, पांडुरंग कुटारे, पमा बिजूले, दिपक लुचारे या तरुणांनी पटापट धरणाच्या पाण्यात उड्या मारून दोघांना शोधायला सुरुवात केली.

    मोठ्या हिमतीने त्यांनी दोघांना वाचवायचा प्रयत्न केला पण तो पर्यंत ते तरुण बुडाल्याने दोघेही मृत्यूमुखी पडले. या सर्व मच्छीमार बांधवांच्या हाताला त्यांचे मृतदेहच लागले. या सगळ्या टीम ने मिळून दोघांचे मृतदेह बाहेर काढले.

    ही बातमी कळताच घटनास्थळी एकच गर्दी झाली. घटनास्थळी परतुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक पोहचल्यावर त्यांनी गर्दी हटवून मृतदेह ताब्यात घेतले. दोन्ही मृतदेहांची ओळख पटली असून दोन्ही मयत मुलांचे मृतदेह सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात शव विच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *