प्रियांक पानचंद व्होरा (वय-३५, रा. पवई, मुंबई), विजय सुभाष यादव (वय -३५, रा. घाटकोपर, मुंबई) असे दगडाच्या खाणीत बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. तर झेनिया वियागत (वय -२९, रा. मुलूंड, ठाणे) या तरुणीला तिचे मित्र व स्थानिकांना वाचवले आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियांक, विजय आणि झेनिया या तिघांसह सहा मित्र, यामध्ये दोन तरुणी शनिवारी दुपारनंतर लोणावळ्यात वर्षाविहाराला आले होते. त्यांनी वरसोली येथे एक बंगला भाड्याने घेतला होता. सायंकाळी ते सर्वजण बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या डोंगराच्या पायथ्या जवळील एका दगडाच्या खाणीकडे फिरायला गेले होते. यावेळी ते दगडाच्या खाणीतील पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता, त्यांना खाणीतील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे दोघांचा जागीच बुडून मृत्यू झाला तर एका तरुणीला त्यांच्या मित्रांनी स्थानिकांच्या मदतीने वाचविले. हे सर्व मित्र-मैत्रिणी हे मुंबईतील एका फायनान्स कंपनीत कामाला आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करत बुडालेल्या दोघांना त्यांच्या मित्र व स्थानिकांच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना नजिकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांचा यापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेची फिर्याद त्यांचा मित्र
अभिजीत सावंत यांने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून, या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे पोलीस किशोर पवार हे करीत आहेत.