नारायणगाव येथे त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. बंडानंतर काही दिवसांनंतर त्यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. अशा राजकीय वातावरणात आपली भूमिका तटस्थ आहे. पुढेही तटस्थ राहील. आपल्या आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण करेल. तसेच आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची मानसिकता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
बेनके आणि पवार कुटुंबात ४५ वर्षांहून अधिक जुने संबंध आहेत. माझे वडील वल्लभ बेनके यांनी शरद पवार यांची साथ कधी सोडली नाही. शरद पवार हे माझे दैवत म्हणून तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नेते म्हणून स्थान आहे. या दोघांनाही मी बाजूला करू शकत नाही. त्यामुळे मी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे यावेळी अतुल बेनके म्हणाले.
सध्याची परिस्थिती पाहता विधानसभेची २०२४ ची निवडणूक न लढविण्याची आपली मानसिकता झाली असल्याचे देखील बेनके यांनी सांगितले. माझ्या मतदारसंघासाठी मला अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांची साथ मिळाली. तसेच तालुक्यातील बिबट सफारी डीपीआर, पिंपळगाव जोगे कालवा, किल्ले शिवनेरी विकास परिसर, रस्ते, बिबट निवारा केंद्र आणि बंधाऱ्यांची कामे अजित पवारांमुळे मार्गी लागली असल्याचे त्यांनी सांगितले.
अजित पवार यांच्या बंडामुळे अतुल बेनके काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आपल्याला डेंग्यू झाल्याने आपण उपचार घेत होतो, असे सांगत त्यांनी बरे झाल्यावर कार्यकर्त्यांशी बैठक घेतली. त्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी जनतेने मला निवडून दिले आहे. राहिलेल्या वर्षभराच्या कालावधीत जास्तीत जास्त विकास कामे करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी अतुल बेनके यांनी स्पष्ट केले.